ठाणे : पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पालघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. डॉक्टरांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करणे उचित नाही. अशा घटनांना शिवसेना पाठीशी घालणार नाही. रुग्णाच्या बाबतीत काही गैरप्रकार घडला असेल तर कायदेशीर तक्रार करणे आवश्यक होते. कायदा हातात घेणं उचित नाही. त्याचे समर्थन शिवसेना करणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. या घटनेत मारहाण करणारे शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन करण्यात येईल. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरांवर केलेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही, शिवसेना समर्थन करणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्रात आणि केंद्रात शिसवेना भाजपसोबत युतीत आहे. शिवसेना आणि भाजप एका विचारधारेने जोडलेले मित्रपक्ष आहेत. गोव्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेची भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. खोटी कागदपत्रे सादर करुन, काही माहिती लपवून निवडणूक लढवणाऱ्यांवर कारवाई होईल, असे ते म्हणाले.