पालघर शहर : खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठीची बहुप्रतीक्षित ऑनलाईन सोडत (लॉटरी) अखेर 6 एप्रिल रोजी जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यातील अर्ज दाखल झालेल्या 5,389 बालकांच्या पालकांची लक्ष प्रवेशाच्या शाळानिहाय निवड यादीकडे लागले असून, 9 एप्रिलपासून पालकांना मोबाईलवर एसएमएस मिळण्यास सुरुवात होणार आहे.
पालघर जिल्ह्यात यंदा आरटीई प्रवेशासाठी 5,685 जागा उपलब्ध होत्या, ज्यासाठी 5,389 अर्ज दाखल झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांचे प्रमाण घटले असून उपलब्ध जागांपेक्षाही कमी अर्ज आले आहेत. उच्च न्यायालयाने 1 किलोमीटरची जाचक अट रद्द केल्यानंतर अर्जांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असली, तरी दुर्गम भागातील जनजागृतीचा अभाव आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे जिल्ह्याचा प्रतिसाद यंदा 95 टक्क्यांवरच थांबला आहे.
आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च रोजी संपल्यानंतर सर्व पालकांचे लक्ष आता सोडतीकडे लागले होते. 6 एप्रिल रोजी पुणे शिक्षण विभागाकडून अधिकृत सोडत जाहीर झाली असून प्रवेशबाबतचे संदेश पालकांना गुरुवार 9 एप्रिलपासून प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. एसएमएस मिळाल्यानंतर पालकांनी तातडीने तालुका किंवा जिल्हा स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
समितीच्या अभिप्रायनंतरच शाळेत प्रवेश निश्चित केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. केवळ मोबाईलवरील एसएमएसवर अवलंबून राहू नये. तांत्रिक कारणामुळे एसएमएस मिळण्यास उशीर होऊ शकतो. अशावेळी पालकांनी आरटीई पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाचा क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे की नाही, याची खात्री करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे. लॉटरीत नाव आलेल्या पालकांनी दिलेल्या मुदतीतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. मुलाचे नाव यादीत असूनही जर एखादी शाळा प्रवेश नाकारत असेल, तर अशा शाळांवर दंडात्मक कारवाई किंवा मान्यता रद्द करण्यापर्यंत पावले उचलली जातील. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून कोणत्याही एजंटवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. पालकांना लॉटरी प्रक्रिया आणि सूचना पाहण्यासाठी शिक्षण विभागाने अधिकृत लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यावरच शिक्षकांना आपली पटपडताळणी नोंदवायची आहे.