Palghar Rice Farming 
पालघर

Palghar Rice Farming: पालघर जिल्ह्यात भातशेती संकटात; वातावरण बदल

वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल

पुढारी वृत्तसेवा

सचिन भोईर

विक्रमगड: भातशेतीसाठी ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यात आज भात उत्पादक शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते.

विशेषतः वाडा व विक्रमगड परिसरात पिकणारा 'वाडा कोलम' हा भात आपल्या रुचकर चव, सुगंध आणि गुणवत्तेमुळे राज्यासह देशभर प्रसिद्ध आहे. मात्र बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे ही पारंपरिक भातशेती आज संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

गेल्या काही वर्षांत हवामानाच्या लहरीपणात मोठी वाढ झाली आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाचा दीर्घ खंड यामुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडत आहे. योग्य वेळी पाऊस न झाल्याने पेरण्या उशिरा होतात, तर अतिवृष्टीमुळे उभे पीक पाण्यात बुडून नुकसान होते. या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असून शेतीवरील विश्वास कमी होत चालला आहे.

दुसरीकडे भात बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर साहित्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे भातशेतीचा खर्च सातत्याने वाढत असताना उत्पादनाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.काही वर्षी चांगले उत्पादन मिळाले तरी व्यापाऱ्यांकडून योग्य दर मिळत नाही.

शासनाच्या खरेदी केंद्रांवर भात विक्री केल्यास पैसे मिळण्यास होणारा विलंबही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. परिणामी उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारातील अनिश्चितता यामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडकून पडला आहे.

भातशेतीक्षेत्र घटण्याची भीती

कोकणातील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ जोडलेली असलेली भातशेती टिकवून ठेवण्यासाठी शासनाने विशेष धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात पालघरसह संपूर्ण कोकणातील भातशेतीचे क्षेत्र झपाट्याने घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भातशेती टिकली तरच शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम राहील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT