पालघर / ठाणे : मंगळवारी राज्यातील सर्वांत विक्रमी पावसाची नोंद पालघर जिल्ह्यात झाली आणि पालघर-वसई-विरारमध्येच जलप्रलय का आला याचे उत्तर हवामान खात्याच्या आकडेवारीने दिले. या कोसळधार पावसाने ठाणे -पालघरला अक्षरशः झोडपले आणि विविध दुर्घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला.
गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ११६.४, रायगड जिल्ह्यात १०८.७,मुंबई उपनगर जिल्ह्यात ९०.४ आणि पुणे जिल्ह्यात ७०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात महामार्गावर पाणी असून वसई-विरारचे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सलग तीन दिवसांच्या पावसाने भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये एस. व्ही. रोडवरील निबंधक कार्यालयाजवळ दुचाकीवरून जाताना अंगावर नारळाचे झाड कोसळल्याने अशोक पाटील (५५) यांच्या मृत्यू झाला. अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली धरणात विकास कांबळे (२९) यांचा बुडून मृत्यू झाला. भिवंडीत कामवारी नदीत वाहून गेलेले मोहम्मद गैस यांचा ४८ तासांनंतरही शोध लागलेला नाही. नाल्यात पडून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मोहम्मद अबुजार याचाही शोध सुरू आहे. भिवंडी अग्निशमन पथक बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबवत आहे.
पाच दिवस वादळी पावसाचा इशारा
मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट,अहिल्यानगर, धुले जळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.
९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
लोणावळ्यात भीषण भूस्खलन
लोणावळा : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पूरस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉईंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू असून मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे, पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर कलम १६३ लागू केले असून, पर्यटनावर काही कडक निर्बंध घातले आहेत.