

मुंबई/सातारा/सांगली/रायगड : महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी बहुतांश भागांत दमदार पाऊस झाला. मुंबईत संततधार सुरू होती. पुण्यातही काही भागांत पाऊस झाला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून, नदीची पाणी पातळी ३० फूट २ इंचांवर पोहोचली आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असून रत्नागिरीत पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. राजधानी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर धुवाँधार पाऊस पडत आहे. या पावसाने मुंबईत दोघांचे बळी गेले. रायगड जिल्ह्यात झेनिथ धबधब्यात पाण्याची पातळी अचानक वाढली. यात १०० पर्यटक अडकले होते. त्यांना दोरीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. वसईच्या नालासोपारा येथे अनेक भागात पाणी शिरले. सुमारे २० गाड्या त्यात बुडाल्या. नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रोच्या खांबाजवळ भूस्खलन झाले. ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
मुंबईत मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) माहितीनुसार, आज सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरात सरासरी २२.७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्यात पूर्व उपनगरात ३८.६९ मिमी आणि पश्चिम उपनगरात ३६.९९ मि.मी. पावसाचा समावेश आहे. वाऱ्यामुळे २५० हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत.
पुण्यात दोन दिवसांत तब्बल ३० झाडपडीच्या घटना
पुण्यातही पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहरात तब्बल ३० झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. मावळ तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंदर मावळातील इंगळून-पारिठेवाडी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने हा महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे.
रायगडमध्ये नद्यांनी ओलांडली धोका पातळी
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी, रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर रायगडच्या उत्तर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे पेण, नागोठणे, पाली, रोहा परिसरात देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यात संततधार
सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कृष्णेसह सांगली जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर हे कृष्णा नदीवरील दोन महत्त्वाचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे तांडव
गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली असून, संततधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन कोलमडले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडली.
रत्नागिरीत सतर्कतेचा इशारा
रत्नागिरीत सर्व भागात नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील काजळी, मूचकुंडी, अर्जुना, कोदवली, वाशिष्ठी नदीकाठच्या गावांना अतिवृष्टीमुळे सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहचली आहे.
मुंबईत दोन ठिकाणी झाड कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबईच्या कुर्ला परिसरात मुसळधार पावसात एका दुकानावर झाड कोसळल्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात रविवारी दुपारी १२.४० च्या सुमारास कुर्ला पश्चिमच्या नौपाडा भागातील हिंदी बीएमसी शाळेजवळ घडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित युनूस कुंडावाला यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून फौजिया रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसर्या घटनेत मुंबईतील आरे कॉलनीत झाडाची फांदी अंगावर पडून एका १८ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला. मृताची ओळख साकीनाका येथील रहिवासी हसन रझा जहांगीर आलम सय्यद अशी पटली आहे. त्याला मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबईच्या वांद्रे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक झाड उभ्या असलेल्या तीन गाड्यांवर कोसळले. नेहरूनगर परिसरात दोन मोठी झाडे कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले.
कोल्हापूरला आज ‘रेड अलर्ट’
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे या भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, नाशिक, पुणे-सातारा घाटमाथ्याला सोमवारी (दि. ६) रेड अलर्ट तर मुंबई, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पाऊस ८ जुलैपासून कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
असे आहेत अलर्ट (५ ते ६ जुलै)
रेड अलर्ट : रायगड (६, ७), नाशिक (६), पुणे घाट (६), सातारा (६).
ऑरेंज अलर्ट : पालघर (६, ७), ठाणे (६), मुंबई (६), रत्नागिरी (६, ७), सिंधुदुर्ग (६), नाशिक (७), पुणे घाट (७), कोल्हापूर घाट (७), सातारा घाट (७).
ताथवडे घाटात दरड कोसळून एक ठार
फलटण : संततधार पावसाचा फटका आता घाटरस्त्यांनाही बसू लागला असून, फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात बारामती येथील योगेश जगताप या चालकाचा मृत्यू झाला. ताथवडे घाटातून प्रवास करत असताना अचानक डोंगरावरून मोठे दगड कोसळले.