पालघरमधील प्रस्तावित बंदराना नागरिकांचा विरोध pudhari photo
पालघर

Port project protests : पालघरमधील प्रस्तावित बंदराना नागरिकांचा विरोध

गुंतवणूकदारांची मात्र जमीन खरेदीसाठी ओढाताण

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले अनेक नवनवीन प्रकल्प सध्या कळीचा मुद्दा बनलेले आहेत अशावेळी वाढवण बंदर असेल की मुरबी येथे होणारे बंदर यासाठी अनेक पातळीवर स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे . याबाबतचे अनेक मोर्चे आंदोलने बैठकांना जोर आला आहे. असं असतानाही ही बंदर होणारच अशी एक वेगळीच शाश्वती गुंतवणूकदारांना आली की काय असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वाढवण डहाणू कासा पर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत तर काही गुंतवणूकदारांनी याआधी मोठ्या प्रमाणावर अशा जमिनींची खरेदी सुद्धा केलेली आहे. तर यामध्ये सुद्धा अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तर आता या जमीन खरेदीचे लोन विक्रमगड तालुक्यापर्यंत पोहोचले असल्याचे सुद्धा दिसून येत आहे कारण की प्रस्तावित बंदरांची वाहतूक यासंदर्भातील गोडाऊन, लॉजिस्टिक्स हे मोठ्या प्रमाणावर विक्रमगड परिसरात होण्याची देखील शक्यता असल्याने आता या भागातील सपाट,डोंगर जे असेल ते खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.

यासाठी या संपूर्ण परिसरातील भूमापिया सुद्धा सक्रिय झाल्याची चर्चा आहे यामुळे एकीकडे या बंदरांना नागरिकांचा वाढता विरोध तर दुसरीकडे गुंतवणूकदारांची गुंतवणुकीसाठी उडाली झुंबड हे दोन्ही विरोधाभास सध्या दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पासंदर्भात वेळोवेळी जन सुनावणी होताना दिसतात मात्र अशा जनसुनावणी स्थानिक लोक उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित होणे किंवा जो प्रमुख व्यवसाय असलेला मासेमारी तो धोक्यात येणे अशा अनेक प्रश्नांनी या समुद्रकिनार्‍यातील नागरिक, मच्छीमार बांधव चिंतत आहेत यामुळे सरकारने आमचा विचार करावा, लोकप्रतिनिधींनी आमच्या पाठीशी राहावे अशी एक माफक अपेक्षा येथील बांधवांची आहे त्यासाठी छोट्या,पर्यायाने मोठ्या सुद्धा लढाया ही लोकं लढत आहेत.

असं असताना सुद्धा एकीकडे लोकांना जगण्या मरण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे तर दुसरीकडे वाढवण भागतील डहाणू पर्यायाने कासा, तवा भागात अनेक गुंतवणूकदार जागा घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील दिसून येत आहे तर आता वाढवणचे बंदर प्रकल्पाचे लोण फक्त डहाणू तालुक्या पुरते मर्यादित नसून याचा थेट इफेक्ट आता विक्रमगड तालुक्यात सुद्धा व्हायला लागला आहे. कारण खडकी, सवादे अशा भागातील अनेक जमिनी खरेदीसाठी आता गुंतवणूकदार येत असल्याचे दिसून येत आहे अशावेळी या जागांना अव्वाचे सव्वा भाव सुद्धा देण्याची तयारी अशा गुंतवणूकदारांकडून होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच भूमाफिया सुद्धा अशा प्रकरणात सक्रिय झाले असून अनेकदा शेतकर्‍यांची यामध्ये फसवणूक सुद्धा होण्याची चिन्हे आहेत.

विक्रमगड तालुक्यातील जमिनी का हव्या आहेत

हा प्रकल्प डहाणू तालुक्यात होत असला तरी हे जगातील दहा बंदरापैकी एक असल्याने याचा आवाका मोठा आहे अशावेळी वाहतूक व्यवस्था थांबविण्यासाठी किंवा समुद्रातून वाहतूक होणारा माल साठविण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील काही जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे याशिवाय या भागातील डोंगरांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. तशा प्रक्रिया सुद्धा सुरू झाले आहेत कारण की वाढवण बंदर होताना समुद्रात भराव करण्यासाठी अशा डोंगरांची भविष्यात मोठ्या प्रमाणावर गरज लागणार असल्याची सुद्धा शाश्वती गुंतवणूकदारांना असल्याने नुसत्याच जमिनी नाही तर डोंगर सुद्धा खरेदी करण्यास एक वेगळी यंत्रणा सक्रिय झाल्याचे देखील पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT