Palghar Paras Churi Success Story:
बोईसर : पालघर तालुक्यातील मुरबे गावच्या भांडारआळी येथील वीस वर्षीय पारस चुरी या तरुणाने आपल्या जिद्दी, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर गुगलसारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे पालघर जिल्ह्याचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे.
पारसने सीईटी परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवत वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर इंजिनीयरिंगसाठी प्रवेश मिळवला. त्याच्या प्रतिभेला ओळखून गुगलने त्याची सॉफ्टवेअर इंजिनीयर पदासाठी निवड केली आहे. सध्या पारस इंजिनीयरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून पुढील वर्षी तो बंगळूरू येथील गुगलच्या कार्यालयात रुजू होणार आहे. पारसचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तारापूर विद्या मंदिरात झाले. दहावीला त्याने ९३ टक्के, तर बारावीला ९२ टक्के गुण मिळवत सातत्यपूर्ण यशाचे उदाहरण घालून दिले.
लहानपणीच पारसच्या आयुष्यात मोठा आघात झाला होता. इयत्ता सातवीत असताना त्याचे वडील, शिवसैनिक कांचन चुरी यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याची आई तृप्ती चुरी यांनी शिलाईकाम करून घराचा व पारसच्या शिक्षणाचा भार सांभाळला. आईच्या कष्टांवर आणि स्वतः च्या मेहनतीवर आधार ठेवत पारसने संघर्षावर मात करत स्वप्न पूर्ण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुकाप्रमुख जयमाला चुरी यांनी पारसचा गौरव करत सांगितले की, "पारसने पालघरचे नाव उज्ज्वल केले आहे. आईच्या कष्टाची आणि मुलाच्या मेहनतीची ही प्रेरणादायी कहाणी आहे."