पालघर

Nalasopar Traffic Congestion : वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; नालासोपारा पूर्व स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात

तुळींज पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बेकायदा अतिक्रमण; पादचाऱ्यांनाही चालणे झाले कठीण

पुढारी वृत्तसेवा

विरार : नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. स्थानकाबाहेरील मुख्य रस्ते, चौक आणि पदपथांवर मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत ही परिस्थिती अधिक गंभीर बनते.

विशेष म्हणजे या संपूर्ण परिसरापासून अगदी हाकेच्या अंतरावर तुळींज पोलीस ठाणे असतानाही बेकायदा फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही दिवस कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी फेरीवाले व्यवसाय थाटत असल्याने समस्या कायमचीच बनली आहे.

दररोज हजारो प्रवासी रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असतात. त्यात नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांचा मोठा समावेश असतो. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून अनेकदा रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी कामावर जाणाऱ्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाहतूक कोंडीत वाया जात आहे.

पदपथांवर फेरीवाल्यांचे पूर्णपणे अतिक्रमण झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांनाही मार्ग मोकळा मिळेल का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, फेरीवाल्यांसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देणे आणि बेकायदा अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे नालासोपारा पूर्व स्थानक परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका आणि वाहतूक विभागाने समन्वयाने काम करून अतिक्रमणमुक्त परिसर निर्माण करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा भविष्यात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"दररोज सकाळी आणि सायंकाळी स्टेशन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. फेरीवाल्यांमुळे चालण्यासाठीही जागा राहत नाही. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी."
संतोष पाटील (स्थानिक नागरिक)
"महाविद्यालयात ये-जा करताना पदपथ उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताची भीती कायम असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे."
पूजा शिंदे (विद्यार्थिनी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT