पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झालेली असून आचारसंहिता लागू झाली आहे. आता पक्षीय भूमिका, माहित महाविकास आघाडीच्या चर्चा, उमेदवारांची तपासणी इच्छुकांची मोर्चे बांधणी अशा सर्व हालचालींना वेग येण्याचा हा कालावधी आहे. मात्र पालघर नगर परिषदेचे राजकारण आचारसंहितेच्या दुसऱ्याच दिवशी पेटले असून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन या त्यामध्ये घोळ असल्याचे तसेच अपात्र मतदारांना समाविष्ट करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्यासाठी मतदार नोंदणी आणि मतदान यादी बदलासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रशासनावर दबाव येत असल्याचा आरोप केला.
लागलीच दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख कुंदन संख्या यानी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळ, एकाच मतदाराची विविध प्रभागात असलेली नावे तर काही मतदारांचे बदललेले प्रभाग याबद्दल आम्ही प्रशासनाला पत्र दिले. तक्रार केली, जो लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे यामध्ये भाजपाला दबाव कसा दिसू शकतो असे उत्तर दिले याच वेळी ज्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना भाजपने अधिकार दिलेले आहेत काय ? त्यांची उपमुख्यमंत्री शिंदे वर बोलण्याची लायकी आहे काय असे सांगत थेट भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांची लायकी काढल्याने आता पालघर नगरपरिषद मधील विरोधी पक्ष सोडा, सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे दिसून येत आहे.
मुळात भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला आरोप आणि त्याला शिवसेना शिंदे गटाकडून दिलेले उत्तर या दोन्हीमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे ते म्हणजे पालघर नगर परिषदेच्या मतदार यादीतील घोळ. प्रभागातली नावे इकडचे तिकडे जाणे, जवळपास साडेचार हजारहून अधिक याबाबतच्या तक्रारी सुद्धा नगर परिषदेकडे प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे निवडणूक आयोग असेल की पालघर नगरपरिषद प्रशासन असेल ह्या यादीतील घोळ मिटविणे, प्रभाग रचना करणे, तक्रार असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्या तक्रारीचे निवारण करणे, त्याचे नाव, राहत असलेला प्रभाग, याची खातरजमा करणे या सगळ्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे.
मात्र सध्या याच कारणावरून महायुतीतील सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकाकडे बोट करत असताना ज्या प्रशासनाने याची उत्तरे द्यायची आहेत, निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही घोळाला जे प्रशासन जबाबदार आहे ते मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून चडीचुप बसल्याने या गोंधळात अजून गोंधळ निर्माण झाला आहे.
भाजपाचे माजी शहराध्यक्ष अशोक अंबुरे कैलास म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली तर त्याला उत्तर म्हणून जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यामुळे विरोधी पक्ष बाजूला जाऊन दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या या वादातून अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या पालघर नगर परिषदेत महायुतीबाबत म्हणा किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या निर्णयावर एकमत कसे होऊ शकेल हा ही मुद्दा आता समोर येत आहे. कारण की या वाटाघाटी करण्याच्या अगोदरच दोन्ही एकमेकांवर दमदाटी करत असल्याने नगर परिषदेतील महायुतीची शक्यता जवळपास मावळल्याचे आता दिसून येत आहे.
पालघरच्या आमदारांचे नाव सुद्धा दुसऱ्या प्रभागात ?
शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने दबावाबाबत शिवसेनेवर केलेले आरोपाचे खंडन करताना जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी या प्रभागातील नावे दुसऱ्या प्रवर्गात गेल्याची अनेक उदाहरणं पुराव्यासहित दाखवली यावेळी चक्क पालघर विधानसभेचे खासदार राजेंद्र गावित हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहत असताना त्यांचे नाव १३ मध्ये गेल्याचे सांगितले तर त्यांच्या मुलगा त्याचे नाव सुद्धा प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेल्याचे यावेळी सांगितले तर अनेक विभागाची नावे सुद्धा दुसऱ्या प्रभागात गेल्याचे यावेळी सांगितले. यामुळे या मतदार यादी एवढा घोळ असेल की चक्क विधानसभेचे आमदारांचा जर प्रभाग बदलत असेल तर सर्वसामान्य मतदारांची काय अवस्था असेल यामुळे पालघर नगरपरिषद प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.