पालघर : नविद शेख
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटात तिरंगी लढत होणार असुन एनवेळी रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. एन वेळी रिंगणात उतरलेला काँगेसचा उमेदवार कोणाचे नुकसान करणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून माजी उपनागराध्यक्ष उत्तम घरत, भाजप कडून माजी गटनेता कैलास म्हात्रे तर ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँगेसचे माजी नगर-सेवक प्रीतम राऊत यांनी काँगेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे. महायुतीची सत्ता असलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी महायुती झाली नाही. दोन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केलेल्या इच्छे नुसार शिवसेना आणि भाजप दोघेही स्वतंत्रपणे निवडणुक लढवत आहेत. महाविकास आघाडीतही बिघाडी झाली असुन ठाकरे गटाचे उपनेते उत्तम पिंपळे यांना नगरध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर एनवेळी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत निवडणुकीत रंगत आणली आहे.
शिंदे गटाने पंचवीस वर्षांपासुनचे नगरसेवक आणि दोन टर्म उप नगराध्यक्ष पद भूषवलेले उत्तम घरत यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र म्हात्रे आणि केदार काळे यांच्या सारख्या इच्छुकांवर मात करून शिंदे गटातील नगरसेवक पदाच्या तिकीट वाटपात उत्तम घरत यांचा वरचस्मा दिसून येतो. नगरपरिषद निवडणुकीची धुरा उत्तम घरत यांनी खांद्यावर घेतली आहे. आमदार राजेंद्र गावित जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि शहरातील
पदाधिकाऱ्यांनी प्रचारात जोर लावला आहे. शिंदे सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. भाजपने ठाकरे गटातुन आयात केलेले माजी गटनेता कैलास म्हात्रे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तिकीट वाटपात कैलास म्हात्रे यांचा शब्द प्रमाण माणण्यात आल्याने जुने पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कानमंत्र दिल्यानंतर नाराज कामाला लागले आहेत. भाजपच्या विजयसाठी खासदार डॉ हेमंत सवरा पालघर मध्ये तळ ठोकून आहेत.
माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गट आणि बवीआ पक्षाची उत्तम पिंपळे यांना साथ आहे. माजी खासदार विनायक राऊत तसेच अमोल कीर्तिकर आणि विलास पोतनीस ठाकरे गटाच्या प्रचार अन्य बाबींवर लक्ष ठेऊन आहेत. तर महाविकास आघाडीतुन बाहेर पडत काँगेसने माजी नगरसेवक प्रीतम राऊत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे.
शिंदे गट आणि भाजपचा प्रचार जोरात असून संसाधना अभावी ठाकरे गटाचा प्रचार संथ आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदे तर भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. नेत्यांच्या सभांचे आयोजन न करता मतदारांच्या थेट भेटी घेण्याकडे ठाकरे गटाचा कल आहे.
शिंदे गटाचे उत्तम घरत, भाजपचे कैलास म्हात्रे आणि ठाकरे गटाचे उत्तम पिंपळे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. काँगेसचा उमेदवार कोणाचे नुकसान करणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.