Palghar Monsoon Diseases control
पालघर : पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावत असतात. अशा आजारावर मात करण्यासाठी व नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. साथ रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली असून आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी ही माहिती दिली.
डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, गॅस्ट्रो आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे वेळीच निदान आणि उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजारांवरील औषधे, चाचणी किट्स आणि प्रतिबंधक साधनसामग्रीचा पुरेसा साठा करण्यात आला आहे. तापाचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक किट्सही उपलब्ध आहेत. साचलेले पाणी हटवणे, डासांचे निर्मूलन, टाक्या स्वच्छ करणे आणि विहिरी व जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांमार्फत विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत, असे चौधरी यांनी म्हटले.
जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी 24 तास संदर्भ सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यासाठी स्वतंत्र संदर्भ सेवा तयार ठेवण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 102 रुग्णवाहिका, तर ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी 108 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व केंद्रांना थेट संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. रेडिओ, बॅनर, पोस्टर, सोशल मीडिया आणि मोबाइलद्वारे व्यापक जनजागृती केली जाणार आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आणि औषध वितरण कर्मचार्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत दिली.