Palghar Mokhada Taluka MSEDCL Power Outage  Pudhari
पालघर

Mokhada Power Crisis | मोखाडा तालुक्यात मान्सूनपूर्व दुरुस्तीनंतरही महावितरणची बत्ती गुल; ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी

डहाणू-गंजाड-सूर्यानगर परिसरातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याचा थेट फटका मोखाडा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

Palghar Mokhada Taluka MSEDCL Power Outage

दीपक गायकवाड

खोडाळा : दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कामे केली. यासाठी प्रत्येक शुक्रवारी तसेच इतर दिवशीही वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला. उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचला असतानाही ग्राहकांनी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सहन केला. मात्र, एवढ्या व्यापक दुरुस्तीच्या कामांनंतरही आजही विविध कारणे सांगून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

डहाणू-गंजाड-सूर्यानगर परिसरातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याचा थेट फटका मोखाडा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत बसतो. पावसाळा सुरू झाल्याने विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास हे प्राणी दिसून न आल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

मोखाडा तालुक्यातील अनेक दुर्गम भागांत आजही वाहतूक सुविधांचा अभाव आहे. एखादी गंभीर घटना घडल्यास रुग्णांना पाच-पाच किलोमीटरपर्यंत डोलीतून वाहून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यानंतरच आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकते. या भागातील भौगोलिक परिस्थिती आणि मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेता, वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे आदिवासी बांधव, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मोखाडा तालुक्याचा विस्तीर्ण जंगलपट्टा आणि डोंगराळ भौगोलिक रचना यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी अनेकदा आठवडे किंवा काही ठिकाणी महिनाभराहून अधिक कालावधी लागतो. परिणामी अनेक गावांतील नागरिकांना दोन-दोन महिने अंधारात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही डोक्याएवढ्या वाढलेल्या गवतामधून आणि जंगलातून पायी फिरून काम करावे लागते. मात्र, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर आवश्यक ती तत्परता दिसून येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

डहाणू-गंजाड परिसरातील बिघाड ठरतो डोकेदुखी

डहाणू, गंजाड आणि सूर्यानगर परिसरातील वीज यंत्रणेमध्ये होणारे बिघाड हे जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागांसाठी कायमची डोकेदुखी ठरले आहेत. या परिसरात कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागांवर होतो. विशेषतः दुर्गम गावांमधील नागरिकांना वारंवार वीजखंडितीचा मोठा फटका बसत असून, त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.

बोराळे उपकेंद्रच ठरू शकते रामबाण उपाय

जव्हार तालुक्यातील जामसर परिसरातील बोराळे येथे प्रस्तावित १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित करणे हा या समस्येवरील प्रभावी उपाय मानला जात आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, वनविभागाच्या परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमुळे या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आल्यास जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील नागरिकांची दीर्घकाळ चाललेली ‘अंधारयात्रा’ संपुष्टात येऊ शकते.

याबाबत पालघर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. हेमंत सारवा यांनीही आग्रही भूमिका घेतली असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT