Khodala Market Illegal Parking Issue Pudhari
पालघर

Palghar News | खोडाळा चौफुलीवर बेशिस्त पार्किंगचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

अवैध प्रवासी वाहने, ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमुळे रस्ते अरुंद; पादचाऱ्यांसह रुग्णवाहिकांनाही अडथळा

पुढारी वृत्तसेवा

Khodala Market Illegal Parking Issue

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील चौफुली परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अवैध प्रवासी वाहने, ट्रॅक्टर, जीप आणि मालवाहू वाहने उभी केली जात असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

खोडाळा येथे आठवडी बाजारासह शाळा, बँका आणि विविध व्यापारी आस्थापना असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे सकाळपासूनच चौफुली ते बाजारपेठ मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

अवैध प्रवासी वाहनांची मुजोरी

चौफुली परिसरातील वाहतूक कोंडीला अवैध प्रवासी वाहनेही कारणीभूत ठरत आहेत. परवानगी नसतानाही प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. प्रवासी भरण्यासाठी ही वाहने वारंवार मागे-पुढे घेतली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. एक वाहन निघताच त्याच जागी दुसरे वाहन उभे राहत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात.

रस्ता सर्वांसाठी असताना काही वाहनचालकांनी जणू त्यावर स्वतःचा हक्कच प्रस्थापित केला आहे. या बेशिस्त पार्किंगचा फटका दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसह शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकण्याची शक्यता निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसांच्या कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी

खोडाळा चौफुली परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पार्किंगचे योग्य नियोजन आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक मोहीम राबविणे आवश्यक झाले आहे. आता संबंधित प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन खोडाळा चौफुली परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT