Mokhada Health Worker Vacancy
दीपक गायकवाड
खोडाळा : मुंबईपासून अवघ्या 120 किलोमीटरवर असलेल्या पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून रिक्त पदांच्या अहवालानुसार तालुक्यातील आरोग्य विभागातील शेकडा 40 टक्के तर काही पदे शतप्रतिशत रिक्त असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व माता सुरक्षित अभियानाच्या गमजा हाकणाऱ्या एकूणच आरोग्य सेवेचे अक्षरशः पितळ उघडे पडले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य पथके (कारेगाव, सूर्यमाळ, आसे) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (खोडाळा, आसे, मोखाडा, वाशाळा) येथील मंजूर पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत.
प्राथमिक आरोग्य पथक स्तरावर वैद्यकीय अधिकारी BAMS ची 5 पैकी 3 पदे (60%), परिचराची 8 पैकी 6 पदे (75%) आणि वाहन चालकाची 4 पैकी 4 पदे (100%) रिक्त आहेत.
तर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावर सर्वात गंभीर परिस्थिती आरोग्य सेविका (ANM) ची आहे. मंजूर 24 पैकी 11 पदे रिक्त आहेत. एकट्या खोडाळा केंद्रात 7 पैकी 5 आरोग्य सेविका नाहीत. याशिवाय वैद्यकीय अधिकारी BAMS ची 4 पैकी 2 पदे, परिचराची 16 पैकी 9 पदे, सफाई कामगाराची 4 पैकी 3 पदे आणि वाहन चालकाची 4 पैकी 4 पदे 100 टक्के रिक्त आहेत.
म्हणजेच संपूर्ण तालुक्यात एकही कायमस्वरूपी शासकीय वाहन चालक कार्यरत नाही.हा केवळ आकडेवारीचा खेळ नाही तर हजारो आदिवासी कुटूंबांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.तथापी शेकडो बाल व मातामृत्यू च्या अपयशातही स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रशासनाने रिक्त पदांबाबाबत कोणतीही तातडीची उपाययोजना न करता एकूणच आदिवासी वाड्या वस्त्यांना रामभरोसे सोडून आपली असमर्थता दर्शवली आहे.
मोखाडा तालुका हा 85 टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेला, डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग आहे. तालुक्यातील बहुतांश लोकसंख्या वारली, कातकरी, महादेव कोळी समाजाची असून आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे खाजगी दवाखाना हा पर्यायच नाही.
आरोग्य सेविका नसल्याने गरोदर मातांची तपासणी, लसीकरण आणि कुपोषणाचे सर्वेक्षण वेळेवर होत नाही, हेच जिल्ह्यातील वाढत्या कुपोषण आणि माता-बाल मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. वाहन चालकच नसल्याने व 108 रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचत नसल्याने आजही अनेक गावांमध्ये गरोदर महिलांना बांबूच्या झोळीवरून, खाटेवरून 10 ते 15 किलोमीटर पायी रुग्णालयात न्यावे लागत आहे. डॉक्टर अभावी सर्पदंश, ताप यासारख्या तातडीच्या रुग्णांना थेट जव्हार किंवा नाशिकला हलवावे लागते.ही वस्तूस्थिती जिल्हा प्रशासन सोयीस्करपणे विसरले आहे.
शासनाकडून आदिवासी भागाच्या विकासाच्या मोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मोखाड्यात साधा डॉक्टर, नर्स आणि रुग्णवाहिका चालकही उपलब्ध नसल्याने शासनाच्या दाव्याची पोलखोल झाली असून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
एकीकडे शासन आदिवासी भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पा मारते तर दुसरीकडे मात्र आडोशी, सुर्यमाळ सारखे शतप्रतिशत आदिवासी लोकवस्ती जोडून असलेले आरोग्य केंद्र मात्र डॉक्टर विना सुरु ठेवत आहे. एकट्या सुर्यमाळला लागून असलेल्या गावपाड्यांसह आश्रमशाळेतील विद्यार्थी धरुन जवळपास 5 हजार लोकवस्ती बाधित झाली आहे. अशीच परिस्थिती आडोशीचीही आहे. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणे हे केवळ प्रशासकीय कर्तव्यच तर घटनेने बहाल केलेला जगण्याचा अधिकार आहे. शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- विष्णू किसन हमरे, माजी सरपंच,सुर्यमाळ