Bonded Labour in Palghar Nashik Tribal Area
पालघर : हनिफ शेख
कामाच्या शोधात 10 ते 15 वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेल्या एका बहिणीला शोधायला निघालेल्या मोखाड्यातील एका भावाला बहिण तर भेटलीच मात्र तिच्या निमित्ताने शेकडो वेठबिगाराचे भयाण वास्तव संगमनेरमध्ये उघडकीस आले आहे. त्यामध्ये अगदी चिमुकल्यांपासून अबालबुद्धांपर्यंत अनेकांचा सामावेश होता. या सर्व वेठबिगारीत ठेवलेल्या 72 लोकांची यामुळे सुटका होवू शकली.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी माझी बहीण बाहेर गावी कामाला जाते म्हणून गेली ती अद्याप आली नाही. या विवंचनेत आयुष्य जगत असताना मोखाड्यातील सुधाकर (बदलेले नाव) याला वाटले की माझ्या बहिणीचा शोध घ्यायला हवा म्हणून त्याने माहिती घेत घेत संगमनेर (अहिल्या नगर)तालुका गाठला. अशावेळी त्याला कळलं की या ठिकाणी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ ही स्वयंसेवी संस्था अशा हरवलेल्या तसेच मानवी तस्करी झालेल्या लोकांचा शोध घेते. त्यांनी तिथे संपर्क केला आणि तिथून अहिल्यानगरची पूर्ण सरकारी व्यवस्था हलली आणि शोध लागला जवळपास 72 लोकांचा, यातील 10 नाशिक जिल्ह्यातील आणि 62 मोखाडा तालुक्यातील. यामध्ये महिला पुरुष आणि चिमुकली मुले सुद्धा, तिथूनच या वेठबिगारांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला गेल्या दहा ते पंधरा वर्ष कदाचित त्याहूनही अधिक काळापासून या ठिकाणी हे मजूर अडकले होते. त्यांना अडकवले गेले होते त्यांच्या छळ सुरू होता. त्यांना उपाशी ठेवले जात होते.
एवढेच काय तर त्यांची लहान मुले ही एखाद्या मेंढपाळाला पाच ते दहा हजारात विकली जात होती असं भयाण चित्र आता समोर आले आहे . या वेठबिगारांमध्ये 72 पैकी मोखाडा तालुक्यातील वेठबिगारांची संख्या 60 एवढी आहे. यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांना जातीचा दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड याचे वाटप व्हावे यासाठी मोखाडा तालुक्यातील सरकारी यंत्रणा कामाला लागली. याचवेळी जिल्हाधिकारी डॉ .इंदूराणी जाखड यांनी यांची भेट घेतली.
यानंतर या घटनेची पार्श्वभूमी दैनिक पुढारीने तपासायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक सहृदयी माणसाच्या पायाखालची वाळू सरकेल असा हा वेठबिगारी मुक्तीचा संघर्ष असल्याचे दिसून आले. मे महिन्यामध्ये सुधाकर हा आपल्या बहिणीच्या शोधात निघाला आणि त्यांनी संगमनेर गाठले मात्र त्याची बहीण ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन त्यांना आणणे कठीण होते अशावेळी त्यांनी तेथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. याबाबत त्यांनी सर्व माहिती घेऊन ती खबर आणि परिस्थिती खरी असल्याचे पक्के झाल्यानंतर अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाला याबाबत कल्पना दिली. आणि अहिल्यानगर येथील सर्व सरकारी यंत्रणां त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले.
यानंतर अगदी पहाटेपासून दुपारपर्यंत त्या त्या भागातील अनेक दगड खाणींवर धडक दिल्यानंतर भयाण वास्तव समोर आले. या ठिकाणी जवळपास गेल्या पंधरा-वीस वर्षापासून पालघर जिल्ह्यातील आणि काही नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबांधव दगड फोडण्याचे काम करीत असल्याचे समोर आले.मात्र या बदल्यात सणासुदीला 10/20 हजार देऊन वर्षभर त्यांच्याकडून काम करून घेणे,पुरुषांना मद्यासाठी 100/ 200 द्यायचे आणि महिला मजुरांना मात्र उपाशीच राहू द्यायचे असेही यावेळी समोर आले. तर हे मजूर पळून जाऊ नये म्हणून यांची सात आठ दहा वर्षांची बालके त्या भागातीलच काही मेंढपाळांना देऊन त्यांच्याकडून अगदी वर्षभराची मजुरी म्हणून दहा हजार रुपये घ्यायचे आणि ते सुद्धा त्या चिमुकल्यांच्या आई वडिलांना न देता स्वतःकडेच ठेवून घ्यायचे असं काम तेथील निर्दयी दगडखाण मालक करीत असल्याचे समोर आले आहे.
कुणी आजारी असले तरीही कामावर जावेच लागायचे अन्यथा मारहाण सुद्धा व्हायची आपल्या हक्काचा आवाज सुद्धा या मजुरांना काढण्याची मुभा नसायची कारण की मुलही आपल्याला देतील की नाही की परस्पर त्यांचा सौदा होईल ह्या भीतीने हे पालक गेल्या 15 ते 20 वर्षापासून या दगडखाणीतील लोकांकडे वेठबिगारी करीत होते. आठवड्याला पाचशे ते हजार एवढीच या कुटुंबांना मजुरी मिळायची. या घटनेनंतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. मात्र यानंतर सुद्धा या घटना बंद होतील का याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. याच ठिकाणी काही जणांची आपत्यही जन्माला आली.मात्र कोणतीही आरोग्य सुविधा यावेळी त्यांना मिळाली नाही.ज्या पालात,तंबूत ते राहायचे तिथेच या महिला प्रसूत सुद्धा झाल्या. तर संबंधितांनी यांच्यातीलच काही मुला मुलींची एकमेकांसोबत लग्नसुद्धा लावून दिल्याचे समोर आले.
यावेळी अमृतवाहिनी स्वयंसेवी संस्था, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी कामगार विभागाचे सर्व अधिकारी तेथील प्रांताधिकारी तहसीलदार या सर्वांनी या वेठबिगारांना त्या ठिकाणाहून मुक्त केले. यानंतर इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्याकडून या वेठबिगारांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात आले. संगमनेरून ही सर्व लोक आपल्या घरी आणण्यात आली.यातील मोखाड्याच्या 62 लोकांना त्यांच्या गावी आणण्यात आले मात्र जेव्हा गावी आणण्यात आले. त्यावेळी येथील त्यांचे नातेवाईक त्यांना ओळखायला सुद्धा तयार नव्हते तर काहींची ओळख सुद्धा पटली. यासाठी जवळपास दीड ते दोन महिन्यांचा अवधी गेला.
आज ही लोकं आपल्या लोकांमध्ये आलेली आहेत.मात्र या लोकांकडे कोणताही त्यांचा माणूस असण्याचा,भारतवासी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नाही यासाठी तत्कालीन मोखाडा तहसीलदार मयूर चव्हाण,त्यानंतरचे तहसीलदार गमन गावित याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली.
त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड,जातीची दाखले देण्यात आले. ज्या मुलांकडे कोणताही कागद नाही, जे आजपर्यंत शाळाबाह्य होते अशा मुलांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सूर्यमाळ आश्रम शाळा किंवा नजीकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश देऊन त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.
या लोकांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम
या वेठबिगारांच्या मुक्तीसाठी श्री अमृतवाहिनी स्वयंसेवी संस्था,यासाठी मदत करणारे अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी पासून कामगार विभाग चे सर्व अधिकारी,तेथील स्थानिक पोलीस, या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी गेल्या दोन-चार महिन्यापासून झटत असलेले इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे सर्व पदाधिकारी,याशिवाय मोखाडा तत्कालीन तहसीलदार,जिल्हाधिकारी या सर्वांनी या वेठबिगारांच्या मुक्तीसाठी मोठे काम केले.
इंटरनॅशनल जस्टीस मिशनकडून या मुलांना कपडे चप्पल आदी साहित्य सुद्धा घेऊन देण्यात आले.तर मोखाडा शिक्षण विभाग,आश्रमशाळा शिक्षण विभाग यांनी सुद्धा एकही कागदपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले.मुळात आज सुद्धा येथील आदिवासींना वेठबिगारीचे जीवन जगावे लागत असल्याने हे कोणत्या प्रगतीचे द्योतक आहे हा सवाल शासनाला विचारणे गरजेचे आहे. आज आपला भारत देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना येथील आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तरी देऊ शकला आहे का, हेच या घटनेतून समोर आले आहे.