Palghar mini bus accident pudhari photo
पालघर

Palghar Accident : पालघरमध्ये मिनी बसचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी

जखमींना तातडीने रुग्णालयात केले दाखल

पुढारी वृत्तसेवा

पालघर/कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा येथे शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मिनी ट्रॅव्हलर बसचा टायर फुटल्याने मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील बिल्लीमोरा येथील लाड कुटुंबीय आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी प्रवास करत होते. सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा परिसरात बसचा टायर अचानक फुटला. त्याचवेळी मागून येणाऱ्या वेगवान वाहनाने मिनी ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि तरुणांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. महामार्ग प्रशासनानेही तातडीने प्रतिसाद देत चार ते पाच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविल्या.

जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या तीन महिलांना पुढील उपचारासाठी धुंडलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, पुष्पावेन लाड (वय 60) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात नैनाबेन लाड (52), टिंकल लाड (29), जगदीश लाड (51), हार्दिक लाड (31), धवल लाड (32), विकी प्रजापती (27), त्रिशा लाड (15), जय लाड (20), जयेश प्रजापती (50), प्रवीण लाड (62), गीता प्रजापती (50), तेजल प्रजापती (25), श्याम लाड (29), कवण लाड (दीड वर्ष), दर्शन लाड (29) हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना डोक्याला, हात-पायांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT