Palghar Mid Day Meal Scheme AI Photo
पालघर

पालघरमध्ये मध्यान्ह भोजन योजनेवर संकट; सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी धान्यपुरवठा नाही; श्रमजीवी संघटनेचा ताटली मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Palghar Mid Day Meal Scheme

दीपक गायकवाड

खोडाळा : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) योजनेसाठी तांदूळ व इतर धान्याचा पुरवठा झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख २६ हजार २५० विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचा प्रश्न गंभीर बनला असून, आठवडाभरात धान्यपुरवठा न झाल्यास जिल्हा परिषदेवर 'ताटली मोर्चा' काढण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१२ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण १ लाख २६ हजार २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळतो. मात्र, यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही आवश्यक धान्याचा पुरवठा झालेला नसल्याने शाळांमधील शिल्लक साठ्यावरच योजना सुरू ठेवावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त असतात. अशा परिस्थितीत ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन हा दिवसातील मुख्य पौष्टिक आहार असतो. त्यामुळे धान्यपुरवठ्यातील विलंबाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पोषण, आरोग्य आणि शालेय उपस्थितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'सरकारला लागलीय भीक... आणि विद्यार्थ्यांना म्हणतंय शाळा शिक'

श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस विजय जाधव यांनी सरकारवर टीका करत, "राज्यातील शाळांमध्ये अद्याप तांदूळ व इतर धान्याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावर गदा आली आहे. दोन दिवसांत धान्यपुरवठा न झाल्यास श्रमजीवी संघटना जिल्हा परिषदेवर ताटली मोर्चा काढेल," असा इशारा दिला.

शिल्लक धान्यावरच सुरू आहे मध्यान्ह भोजन

माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात शेवटचा धान्यपुरवठा झाला होता. त्यानंतर उन्हाळी सुट्ट्या आणि विविध कारणांमुळे मिळालेल्या सुट्ट्यांमुळे काही शाळांमध्ये धान्यसाठा शिल्लक राहिला होता. त्याच साठ्याच्या आधारे शिक्षकांनी जून आणि जुलै महिन्यात मध्यान्ह भोजन योजना सुरू ठेवली. काही ठिकाणी तर कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातूनही विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, आता बहुतांश शाळांमधील धान्यसाठा संपत आल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन हा प्रमुख पौष्टिक आहार असल्याने योजनेवर परिणाम झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हा शिक्षण विभागाचा दावा

या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, जिल्ह्यातील शाळांमध्ये पूर्वीचा धान्यसाठा अद्याप उपलब्ध असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी स्पष्ट केले.

'निकृष्ट धान्य विद्यार्थ्यांच्या ताटात' असा आरोप

श्रमजीवी संघटनेने आणखी एक गंभीर आरोप करत, फेब्रुवारीनंतर शिल्लक राहिलेले धान्य नियमानुसार परत घेणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना तसे झाले नसल्याचे म्हटले आहे. परिणामी, साठवणीत राहिलेले निकृष्ट धान्य विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

दरम्यान, अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाकडे धान्यपुरवठ्याची मागणी करण्यात आल्याची माहिती दिली असून, लवकरात लवकर पुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT