Leopard Sightings Palghar pudhari photo
पालघर

Leopard Sightings Palghar : बिबट्यांचा लोकवस्तीत वावर; बिघडत्या वनपर्यावरणाची धोक्याची घंटा!

अधिवासाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करून संघर्षावर मात करणे अशक्य

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : विश्वनाथ कुडू

सध्या प्रसारमाध्यमांमध्ये बिबटे मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील नवली येथे एका महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली, तर आठवडाभरापूर्वी नावजे येथे बिबट्याने गायीची शिकार केली. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. बिबट्यांना पकडावे, त्यांचे पुनर्वसन करावे किंवा त्यांची संख्या नियंत्रित करावी, अशा मागण्याही पुढे येत आहेत. मात्र, या घटनांमागील मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज तितकीच महत्त्वाची आहे.

बिबटे लोकवस्तीत का येत आहेत, हा प्रश्न केवळ वनविभागापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेशी संबंधित आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, भक्ष्यप्राण्यांची उपलब्धता, पाण्याचे स्रोत, वाढते मानवी अतिक्रमण आणि वनक्षेत्राचे तुकडे पडण्याची प्रक्रिया यांचा वन्यजीवांच्या जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे बिबट्यांच्या वावराकडे केवळ उपद्रव म्हणून न पाहता, मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. जंगलतोड, अनधिकृत बांधकामे, औद्योगिक प्रकल्प, रस्त्यांचे जाळे आणि वनक्षेत्रालगत वाढणाऱ्या मानवी वस्त्यांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर दबाव वाढत आहे.

मोठ्या वनक्षेत्रांचे लहान तुकड्यांत विभाजन झाल्यास वन्यजीवांच्या हालचालींवर मर्यादा येतात. त्यांच्या अन्न-पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो. बिबट्या हा परिस्थितीशी जुळवून घेणारा वन्यजीव असला, तरी त्यालाही सुरक्षित अधिवास, पुरेसे भक्ष्य आणि पाण्याची आवश्यकता असते. या गरजा जंगलात पूर्ण होत नसतील किंवा मानवी वस्त्या जंगलाच्या जवळ विस्तारत असतील, तर बिबट्यांचा मानवी वस्तीशी संपर्क वाढण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्येक बिबट्याच्या वावरामागे एकच कारण असते असे नाही. स्थानिक परिस्थितीचा स्वतंत्र अभ्यास करणे गरजेचे आहे.

देशातील वनक्षेत्राबाबत प्रसिद्ध होणारी आकडेवारी अनेकदा सकारात्मक चित्र दाखवते. मात्र, वनक्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ वाढणे आणि नैसर्गिक, दाट व जैवविविधतेने समृद्ध जंगलांचे संवर्धन होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. नैसर्गिक जंगलांच्या जागी विरळ वनस्पती, एकाच प्रकारची लागवड किंवा पर्यावरणीयदृष्ट्या कमी समृद्ध क्षेत्र निर्माण झाले, तर केवळ क्षेत्रफळाच्या आकडेवारीवरून वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. नैसर्गिक जंगलांचे संरक्षण, स्थानिक वनस्पतींचे संवर्धन आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन या बाबींना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

वनातील प्रत्येक जीवाचे पर्यावरणीय व्यवस्थेत विशिष्ट स्थान असते. तृणभक्षी प्राणी, लहान सस्तन प्राणी आणि इतर भक्ष्यप्राण्यांची उपलब्धता ही बिबट्यासारख्या शिकारी प्राण्यांच्या जीवनासाठी महत्त्वाची असते. जंगलातील अधिवास नष्ट होणे, शिकार प्राण्यांची संख्या कमी होणे किंवा त्यांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होणे यामुळे संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसताच केवळ बिबट्यांची संख्या कमी करण्याचा विचार करणे पुरेसे ठरत नाही. संबंधित परिसरातील वनक्षेत्र, भक्ष्यप्राण्यांची उपलब्धता, पाणवठे, मानवी हालचाली आणि बिबट्यांच्या वावराचा वैज्ञानिक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतरच समस्येच्या स्वरूपानुसार योग्य उपाययोजना करता येतील.

पालघर जिल्ह्यासह संवेदनशील वनक्षेत्रांकडे लक्ष द्या

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार वन्यजीव संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. वनक्षेत्रालगतच्या वाढत्या वस्त्या, रस्ते, औद्योगिक विकास, वनजमिनीवरील अतिक्रमणे आणि पाण्याच्या स्रोतांमधील बदल यांचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे.यासाठी वनविभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरणतज्ज्ञ, संशोधन संस्था आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय आवश्यक आहे.

  • बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, या भीतीचे रूपांतर वन्यजीवांविषयी द्वेष किंवा त्यांना ठार मारण्याच्या मागणीत होऊ नये. त्याच वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून केवळ वन्यजीव संरक्षणाची भूमिका घेणेही योग्य ठरणार नाही. मानवी जीविताचे संरक्षण आणि वन्यजीवांचे संवर्धन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी संतुलित धोरण आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT