Palghar Dahanu Illegal Gutkha Seizure
कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५१ लाख ५४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुजरातमधील एका चालकाविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १२.४० वाजण्याच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाडी गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबवली. यावेळी गुजरातमधील बलसाड येथून उधवा मार्गे कासाकडे येणारा एमएच-४८ डी क्यू-३६२५ क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवून त्याची झडती घेण्यात आली.
तपासणीत टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाची किंमत ३० लाख रुपयांहून अधिक असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सुमारे २१ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पोही जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ५१ लाख ५४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी शहजाद महम्मद याकुब शहा (वय २८, रा. नवसारी, गुजरात) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपी गुजरातमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ भिवंडी परिसरात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाठक करीत आहेत.
या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात अशा बेकायदेशीर धंद्यांवर आणखी मोठ्या प्रमाणात कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरातमार्गे गुटखा तस्करीचे जाळे सक्रिय?
महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा गुजरातमधून पालघर, वसई, नालासोपारा, मुंबई, भिवंडी, कल्याण आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या पोहोचविला जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. यासाठी संघटित गुटखा माफिया सक्रिय असल्याचे बोलले जाते. टेम्पो, पिकअप व खासगी वाहनांमधून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
महामार्गावरील जकात नाके आणि टोल नाक्यांमधून अशा वाहनांना सहज मार्ग मिळत असल्याचा दावा करण्यात येत असून, काही दलाल व संबंधित घटकांकडून या अवैध व्यवसायाला मदत होत असल्याचे आरोपही होत आहेत. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः गुटखा वाहतूक करणारी वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तस्करीचा स्थानिक यंत्रणांना सुगावा कसा लागत नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.