विश्रामगृहापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याखाली मोठे भगदाड पडले Pudhari
पालघर

Palghar News | खोडाळा शासकीय विश्रामगृह–शिरसगाव मार्गावर मोठे भगदाड; अपघाताचा धोका वाढला

मोरीचे पाईप उघडे पडून दोन्ही बाजूंनी तुटल्याने रस्ता धोकादायक

पुढारी वृत्तसेवा

Khodala Shirasgaon Road Potholes Issues

खोडाळा : खोडाळा येथील शासकीय विश्रामगृह ते शिरसगाव या मार्गावर गंभीर प्रकार समोर आला असून, विश्रामगृहापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याखाली मोठे भगदाड पडले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या मोरीचे पाईप उघडे पडून दोन्ही बाजूंनी तुटल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.

या मार्गावर तीव्र वळणासह चढ-उतार असल्यामुळे वाहनचालकांना आधीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भगदाडामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहनाचा तोल सांभाळणे कठीण ठरत आहे. परिणामी, मोठ्या जीवितहानीचा धोका व्यक्त केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोखाडा यांनी या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा मार्ग कमी अंतराचा आणि वेळ वाचवणारा असल्याने वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, घाटमाथ्यावरील वळणांमुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, कुर्लोद, बोटोशी, मानीपाडा आणि पेठेपाडा या दुर्गम गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुळात हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असला तरी मागील काही वर्षांपासून त्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोखाडा यांनीच केली आहेत. त्यामुळे सध्या या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

हा रस्ता आमच्या अखत्यारीत असला तरी त्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोखाडा यांनी केली आहेत. आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याने मागील काही वर्षे तेच कामे पाहत आहेत. सध्या आमचा थेट संबंध नाही.
- इरफान खान पठाण, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT