संदीप जाधव
Palghar Shooting Incident Kelve resort Gunshot
बोईसर : केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर गोळी लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या बेटेगाव येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तेजल भिडे असे जखमी तरुणीचे नाव असून ती बोईसरच्या लोखंडीपाडा येथील रहिवासी आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तरुणीसोबत फिरायला गेलेला तरुण दिनेश धोडी (रा. लोखंडीपाडा) याच्याकडील पिस्तूलातून अचानक गोळी झाडली गेली. ही गोळी तेजलच्या मानेत घुसल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर जखमी तेजलला तातडीने बेटेगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून तिच्या मानेत अडकलेली गोळी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत तपासाची माहिती घेतली. रुग्णालयाबाहेर नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली आहे.
दरम्यान, या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, गोळी अपघाताने झाडली गेली की हेतुपुरस्सर, याचा तपास पोलीस करत आहेत. दिनेश धोडी याच्याशी संबंधित पिस्तूल अधिकृत आहे की बेकायदेशीर, याचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.