जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कसारा कडकडीत बंद Pudhari
पालघर

Kasara Bandh | जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कसारा कडकडीत बंद

विविध पक्ष-संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Kasara Shut Down

कसारा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कसारा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दर्शवत बहुतांश व्यवहार बंद ठेवले.

या बंदला काँग्रेस, शिवसेना, भारतीय बौद्ध महासभा, आगरी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, आदिवासी महादेव कोळी समाजासह विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीच्या कसारा शहर शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले.

रॅलीपूर्वी बसस्थानक परिसरात ॲड. अमर भरीत यांच्या नेतृत्वाखाली मुसळधार पावसात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कसाराचे सरपंच प्रकाश वीर, सामाजिक कार्यकर्ते देवभाऊ उबाळे, चेतन पगारे, शांतिभाई शेजवळ, सागर सांगळे, पियुष शिंदे आदींनी जंतर-मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.

यानंतर काळ्या फिती लावून शांततेत निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा आणि केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या एका आंदोलक तरुणीला न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली.

बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT