Palghar Kasa Hospital  Pudhari
पालघर

Kasa Hospital | कासा उपजिल्हा रुग्णालयात जन्म दाखल्याच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी

सरकारी सेवा की 'वसुली केंद्र'? उपजिल्हा रुग्णालयातील कथित प्रकाराने आरोग्य विभाग हादरला

पुढारी वृत्तसेवा

Palghar Kasa Hospital Bribery Case

कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जन्मदाखला देणे व त्यामधील दुरुस्तीच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून पैशांची कथित वसुली केली जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे विशेषतः आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आष्टे धांगडपाडा येथील मिथुन देवजी धंगडा यांनी आरोप केला की, मुलाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी प्रथम रुग्णालयात गेल्यावर त्यांच्याकडून १०० रुपये घेतले गेले. त्यानंतर जन्मदाखल्यामध्ये त्रुटी असल्याने दि. २७ जून २०२६ रोजी दुरुस्तीसाठी पुन्हा गेल्यावर १५० रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला.

"आम्ही रोजंदारीवर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सरकारी सेवेसाठीही पैसे मोजावे लागत असतील, तर याच्यासारखं दुर्दैवाची गोष्ट नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शासनाने जन्मदाखल्यासाठी कोणते अधिकृत शुल्क निश्चित केले आहे का? असल्यास त्याची अधिकृत पावती नागरिकांना दिली जाते का? आणि शुल्कच नसल्यास पैसे कोणाच्या आदेशाने व कोणत्या अधिकाराखाली घेतले जात आहेत? या सर्व बाबींची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयातील दंत सहाय्यक (वर्ग-४ कर्मचारी) सोमनाथ रुद्राक्ष हे संगणकावर बसून जन्मदाखले तयार करून वितरित करत असल्याचे सांगितले जात आहे. जर सोमनाथ रुद्राक्ष हे दंत सहाय्यक असतील तर मग त्यांना दाखले सोडण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना तो अधिकार आहे का आणि दाखल्यांचे पैसे वसुली करण्याचे अधिकार आहे का वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालतात की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहे हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.

या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सरकारी कार्यालयातच अनधिकृत वसुली, कागदपत्रांच्या प्रक्रियेत कथित अनियमितता किंवा अधिकारांचा गैरवापर होत असेल, तर तो अत्यंत गंभीर प्रकार मानला जावा, अशी मागणी होत आहे.

नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी आणि सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

- जन्मदाखला व दुरुस्तीच्या नावाखाली ₹१०० ते ₹१५० घेतल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप

- दंत सहाय्यकाला ऑफिसचे काम कोण करायला लावतो

- दंत सहाय्यकाकडून संगणकावर बसून दाखले वितरित केल्याचा आरोप.

- उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही गैरप्रकार अथवा नियमभंग झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाच्या प्रचलित नियमांनुसार कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT