

पालघर शहर: पालघर नगरपरिषदेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतीमध्ये पालघर नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीचा समावेश आहे. नगरपरिषद जुन्या इमारतीचा रस्त्यालगत असलेला काही भाग शनिवारी रात्रीच्या सुमारास कोसळला. सुदैवाने त्यावेळी तिथे कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला.
पालघर शहरातील धोकादायक इमारतींची यादी मे महिन्यात पालघर नगर परिषदेने प्रसिद्ध केली होती. अति धोकादायक व राहण्यास अयोग्य इमारतीचे यादीत 54 इमारतींचा समावेश होता.
इमारत मोकळी करून सरचनात्मक दुरुस्ती प्रवर्गात 44 इमारती व इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती प्रवर्गातील 11 इमारतींच्या समावेश करण्यात आला होता अशा एकूण 119 इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. धोकादायक इमारतींच्या यादीत पालघर नगर परिषदेच्या कार्यालयाची जुन्या इमारतीचा देखील समावेश आहे.
पालघर नगरपरिषदेच्या कार्यालयाची इमारत ही भर वस्तीत असून इमारतीतील रस्त्यालगत असलेल्या बाजूस दुकाने आहेत. प्रमाणे आतील भागात फुल-हार, नारळ विक्रेते व्यवसाय करतात. दुसऱ्या बाजूस फळ विक्रेते इमारती खाली विक्री करतात.
पहाटेच्या सुमारास पंचक्रोशीतील शेतकरी, महिला वर्ग भाजी विक्रीसाठी या इमारतीखाली बसतात तर त्यानंतर फळ विक्रेते सदर ठिकाणी बसतात. या धोकादायक इमारतीचा काही भाग रात्रीच्या वेळी खाली कोसळल्याने व त्या क्षणी परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मात्र भर दिवसा वरदळीच्या वेळी जर ही घटना घडली असती तर नागरिकांच्या जीवावर बेतले असते. सदरची घटना लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेने ठोस पाऊल उचलत उपाययोजना करण्याची गरज आहे.
सदर इमारतीतील दुकानदारांना वारंवार सूचना बैठकी सुद्धा घेण्यात आल्या. मात्र तेथील दुकानदार विकण्याच्या मनस्थितीत नाही. विक्रेते व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास सगळ्यांच्या समन्वयाने योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल.
- प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद