Palghar Tourist Ban Pudhari
पालघर

Palghar Tourist Ban: पालघरच्या धोकादायक धबधबे, धरणांवर बंदी

चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाचा कठोर निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पावसाळ्यात निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची वाढणारी गर्दी आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालघर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढणाऱ्या आणि धोकादायक ठरणाऱ्या वांद्री धरण, तांदूळवाडी धबधबा आणि वाघोबा खिंड येथील धबधबा या पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.

पालघर उपविभागीय दंडाधिकारी श्याम मदनुकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मनाई आदेश १५ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

पावसाळ्यात वांद्री-ढेकाळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, धरणातील पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत.

प्रशासनाच्या आदेशात नमूद केल्यानुसार, वांद्री-ढेकाळे धरणामध्ये सन २०२३ मध्ये दोन आणि सन २०२५ मध्ये दोन अशा एकूण चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

यापूर्वीही पावसाळ्यात पर्यटकांकडून धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.

या आदेशानुसार संबंधित पर्यटनस्थळी पर्यटकांनी जाणे, धरणातील अथवा धबधब्याच्या पाण्यात उतरणे, तसेच धोकादायक कड्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि प्रवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाचा आनंद घेताना निष्काळजीपणा जीवावर बेतण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT