पालघर/ठाणे : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने शनिवारी हाहाकार उडवला. वसई-विरार शहरात पाणीच पाणी झाले होते. पालघर जवळील वाघोबा खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, तर वसई पूर्वेतील सकवार येथे १३ जण पुराच्या पाण्यात अडकले. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.
शाळांना सुट्टी असतानाही कार्यालयीन कामासाठी बोलावण्यात आलेले ४१ शिक्षक वसईच्या पुरात अडकून पडले. त्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, कल्याण, डोंबिवली, भिवंडी ही शहरे जलमय झाली, तर विविध घटनांत दोन बळी गेले.
शासनाने सुटी जाहीर केली असताना कार्यालयीन कामासाठी बोलावलेले ४१ शिक्षक वसईच्या पुराच्या पाण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पुढे आला. एनडीआरफच्या जवानांनी अखेर या शिक्षकांची सुटका केली आहे. शाळेच्या परिसरात चार फुटापेक्षा जास्त पाणी आल्याने हे शिक्षक अडकले होते.
सफाळे भागात पुरामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. शांतीनगर परिसरात रहिवासी वसाहतीतही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जलसार रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. झाडे उन्मळून पडण्याच्या सात ते आठ घटना घडल्या.
ठिकठिकाणी स्थलांतर
विक्रमगड तालुक्यातील उटावली येथे घराचे अंशतः नुकसान झाले. सुखसाळे सुरू पाडा चंद्रकांत गणपत सुरू यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान जीवितहानी नाही, दादडे येथे अजित बाळू वारंगडे यांच्या झोपडीचे नुकसान झाले. देहरजे नदी पुलावरून पाणी जात असल्याने शीळ व देहर्जे गावांना जोडणारा रस्ता बंद विक्रमगड मार्गे पर्याय मार्ग आहे.मनोर भोपोली पुलावरून पाणी वाहत आहे. वसई तालुक्यात ठिकठिकाणी घरामध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.विरार आणि नालासोपारामध्ये पाणी साचले नवघर एसटी स्थानक मध्ये फलाट क्र. 3 च्या शेडवर मोठे झाड पडून नुकसान. तर पालघर तालुक्यातील मनोर वाघोबा घाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ढेकळे फन हॉटेल व वेगास हॉटेलसमोर नॅशनल हायवेवर पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती, तर केळवा रोड ते केळवा खांबखाडी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद होती. सफाळे तांदूळवाडी रस्ता पूर्णपणे बंद, घाटात झाड पडले होते.
एम्बुर टोकेपाडाजवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सावरेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. जलसार टेंभी खोडावे व जलसार जेटीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. गोवाडे रायपाडा रस्त्यावर पाणी साचून रस्ता बंद एडवण मार्गे डोंगरे खार्डी दातीवरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहतूक बंद कोळगाव ब्रिजवर पाणी साचल्यामुळे पालघर बोईसर रस्ता बंद पर्याय रस्ता उपलब्ध आहे. आल्याळी नवापाडा परिसरात पीडब्ल्यूडी विभागामार्फत अपूर्ण अवस्थेत बांधलेल्या गटारीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. खामलोली येथे वाघेश पाटील यांच्या घरात पाणी शिरले. बरहाणपुर येथे भरत तुमडा यांच्या घराची भिंत कोसळली मात्र जीवितहानी झालेली नाही. पालघर नगरपरिषद नंडोरे नाका येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरले आहे.
ठाणे जिल्ह्यात कोसळधार; पावसाचे २ बळी
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून ठाणे, मुंब्रा, शिळफाटा, कल्याणसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. शुक्रवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला असल्याने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. ठाण्यात दिवसभर ११८ मिमी पाऊस पडला असून आजमितीला एकूण पाऊस ८८२ मिमी पडला आहे. गतवर्षी याचदिवशी ९५९.८१ मिमी पावसाची नोंद झाली होती.
कळव्यातील खारेगाव नाक्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर झाड कोसळल्याने जखमी विजय पली ( ३२) रा. साबेगाव दिवा आणि राजकुमार यादव ( ३४) रा. गोलाईनगर कळवा पूर्व हे दोेघे जखमी झाले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महाकाय झाडामुळे काही तास वाहतूक सेवा ठप्प होती. अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या विश्वनाथ कांबळे (वय २२) रा. उल्हासनगर-५) या तरुणाचा पाण्यात बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात माळशेज घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. शनिवारी दुपारीपावणे दोनच्या सुमारास कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवर डोंगराचा काही भाग आणि दरड कोसळली. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तासभर मुरबाड ते अहिल्यानगर ही वाहतूक ठप्प झाली होती.
मखमली तलावजवळील ड्रेनेजची टाकी साफ न झाल्याने गटारीचे दूषित पाणी शिवानंद उद्योग संकुलात शॉपमध्ये शिरले. कोपरीमधील साईबाबा मंदिर जवळ संरक्षक भिंत पडली. एमएम सिटी ग्रीन पार्क मुंब्रा, शिळफाटा रोड पाण्याखाली गेले. दत्तूशेठ कोळी चाळ, चेंदणी कोळीवाडा येथे २५ फूट बाय ५ फूट अशी सुरक्षा भिंत आणि मोठे वृक्ष धोकायदायक बनले आहे. माजिवडा येथे झाड पडले , साकेत येथे महालक्ष्मी मंदिराजवळ पाणी साचले होते.