Palghar heatstroke death pudhari photo
पालघर

Palghar heatstroke death : पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी?

तीव्र उन्हात महिलेला चक्कर येऊन जागीच मृत्यू; प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली असून उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केलेला असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनाच्या आपत्कालीन तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील वरई फाटा (नाक्या) परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला सफाळेच्या दिशेने जाण्यासाठी वरई नाका परिसरात आली होती. एसटी बसमध्ये चढत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्याची जाणीव होताच ती माघारी फिरली, मात्र काही क्षणातच ती रस्त्यालगत कोसळली. उपस्थित नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तिचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तीव्र उन्हामुळे आणि अचानक प्रकृती बिघडल्याने हा उष्माघाताचा प्रकार असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड यांनी दिली.

दरम्यान, हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात काही भागांमध्ये तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र किंवा उष्माघात नियंत्रण कक्ष यांसारख्या उपाययोजना प्रशासनाकडून अद्याप प्रभावीपणे दिसून येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि त्यात घडलेली ही घटना पालघर जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT