पाण्याचा वापर करत वीजबिलांकडे ग्रामपंचायतींची पाठ  pudhari photo
पालघर

Palghar News : पाण्याचा वापर करत वीजबिलांकडे ग्रामपंचायतींची पाठ

तगादा लावत मिळवले पाणी मात्र,वीजबिलांना थेट नकार

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा : हनिफ शेख

जलजीवन योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग पालघर यांच्याकडून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पहिल्या टप्प्यातील करावयाच्या काम जवळपास 90 टक्के होऊन अधिक पूर्ण झालेले आहे. तर जिल्हा परिषदेकडून गावाजवळ असलेली पाण्याची टाकी ती घरापर्यंत नळ हे काम 50 टक्क्यांच्या आसपास झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे तर या कामांची बीले मिळत नसल्याने ठेकेदार हे काम करताना अनुत्सुक दिसत आहेत.

मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मध्य वैतरणा धरणावरून गावांच्या जवळ उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पाणी आलेले आहे. किंबहुना टाक्या भरलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी पत्र देऊन हे पाणी सोडण्यासंदर्भात सांगितले. ग्रामपंचायतींच्या पत्रानुसार जिथे नळ पाईप जोडणी झालेली होती त्यांना नळाद्वारे आणि जिथे अशी पाईप जोडले गेले नव्हते त्या ठिकाणच्या विहिरीपर्यंत पाणी सोडण्यात आले यामुळे आता अशा पाणी घेतलेल्या सर्व ग्रामपंचायतींना या पाण्याच्या मोबदल्यात विज बिल देण्यात आलेले आहे.

मात्र आता काही ग्रामपंचायतींनी ही वीज बिल घेण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे तर काहींनी आम्ही अद्याप पर्यंत पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली नसल्याचे तोंडी सांगितले आहे. यामुळे आता मोखाडा तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाला असून पाणी लागत होते. तेव्हा मात्र ग्रामपंचायती पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तगादा लावत होते आणि जेव्हा आता त्याची वीज बिल आले तर मात्र पळ काढत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी सोडण्याची प्रक्रिया आता थांबविण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यासाठी राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ही सर्व तालुक्यांपेक्षा वेगळी आहे कारण की प्रचंड मोठा पाणी स्रोत असलेल्या मध्यवैतरणा धरणावरून ही योजना कार्यान्वित केली आहे. यामध्ये दोन टप्प्यांमध्ये काम झालेले आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलशुद्धी केंद्र देवगाव या ठिकाणी उभारून त्यानुसार ग्रामपंचायती आणि गावपाड्यांच्या निकषावर त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारलेले आहेत.

मध्य वैतरणा ते उभारलेली पाण्याची टाकी इथपर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. आणि मग तिथून प्रत्येकाच्या दारात नळ पोचविण्याची वेगळी योजना जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे आहे. यामुळे मोखाडा तालुक्यातील ही योजना यशस्वी होईल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र आता ही योजना संपूर्णपणे पूर्णत्वास जाण्याच्या अगोदरच वीजबिलांचा तिढा मात्र निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एकूण 90 पैकी 87 पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे यातील 40 टाक्या पाणी भरून तयार असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

इथून पाणी सोडायची जबाबदारी मात्र ग्रामपंचायतची असणार आहे आणि 1.72पैशांत तब्बल 1000 लिटर शुद्ध पाणी ग्रामपंचायत दिला मिळणार आहे. यानुसार आत्तापर्यंत ज्या ग्रामपंचायतीने पाणी सोडण्या सदर्भात पत्र दिले त्या ग्रामपंचायतीला हे पाणी सोडण्यात आले होते. यानंतर मात्र जेव्हा या पाण्याच्या मोबदल्यात वीज बिल ग्रामपंचायतीला देण्यात आली तेव्हा मात्र ही वीजविले कशी भरायची हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

यामुळे काही ग्रामपंचायतींनी थेट वीज बिले घेण्यास च नकार दिला तर काही ग्रामपंचायतींनी आम्हीही पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतले नसल्याचे देखील सांगितले आहे. यामुळे उन्हाळ्यात जेव्हा पाणीटंचाई होती लोकांची मागणी होती. तेव्हा मात्र पाणी सोडण्यासाठी अनेकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तगादा लावण्यात आला.

यानुसार त्यांनी पाणीही सोडले आणि आता मात्र वीज बले भरण्यास ग्रामपंचायत नकार देत असल्याने सध्या हे पाणी सोडणे बंद केले आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. तर काही नागरिकांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे यामुळे या यामध्ये नेमकी चूक कोणाची हा प्रश्न जरी अनुत्तरीतच असला तरी पाण्यापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक, ग्रामसभेत माहिती देणे गरजेचे

पाणीटंचाई आणि मोखाडा तालुका हे समीकरण काही केल्या मिटत नव्हते मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारकडून जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव प्रत्येक पाडा पाणीटंचाई मुक्त करण्याकडे वाटचाल सुरू आहे त्यातूनच आता मोखाडा तालुक्यात या पाणीपुरवठ्याच्या योजना कार्यान्वित होत आहेत मात्र योजनेच्या सुरुवातीलाच जर वीजबिलावरून असा गोंधळ निर्माण होणार असेल तर मात्र ही योजना बारगळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही यामुळे आता ग्रामपंचायतींची मोठी जबाबदारी असून याबाबत ग्रामसभा किंवा लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून शुद्ध पाण्याच्या मोबदल्यात पाणीपट्टी भरणे कशी आवश्यक आहे हे पटवून द्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT