पालघर शहर :
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेले कचरा स्पॉट कायमस्वरूपी संपवण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत राबवलेल्या विशेष उपक्रमामुळे शहरातील कचरा साचण्याचे प्रमाण झाले असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध आता कठोर पावले उचलली जात आहेत. कचरामुक्त पालघर करण्यासाठी नगरपरिषदेने आता केवळ फलकबाजी न करता प्रत्यक्ष रंगरगोटी आणि देखरेखीवर भर दिला आहे.
पालघर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, पालघर बोईसर मार्ग, रेल्वे स्थानक परिसर, माहीम मार्ग, मनोर रस्ता आणि पूर्व भागातील अनेक मुख्य नाक्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले असायचे. अनेकदा सूचना देऊनही नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकत होते. मात्र, आरोग्य विभागाने आता या ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करून तिथे कडक सूचना देणारे फलक लावले आहेत. परिसरात ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छता राखली जात असल्याने दुर्गंधी कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या या सातत्यामुळे 80 टक्के कचरा स्पॉट आता पूर्णपणे स्वच्छ झाले आहेत.
उघड्यावर कचरा टाकण्याची नागरिकांची जुनी मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य विभागाने नवनवीन संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी पूर्वी कचऱ्याचे ढीग असायचे, त्या जागा स्वच्छ करून तिथे आता रंगरगोटी आणि आकर्षक सजावट केली जात आहे. ज्या ठिकाणी सुशोभीकरण असते, तिथे कचरा टाकण्यापूर्वी नागरिक विचार करतात. हा उपक्रम काही काळापुरता नसून यात सातत्य राखले जाईल. जे नागरिक अजूनही अंधारात कचरा टाकतात, त्यांना सुरुवातीला समज दिली जाईल आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे भूषण कबाडे यांनी सांगितले आहे.
पालघर नगरपरिषद क्षेत्रात सध्या 16 घंटागाड्या कार्यरत असून, प्रत्येक गाडीवर तीन कर्मचारी नियुक्त आहेत. याशिवाय रस्ते आणि बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी 5 मिनी ट्रक (टिपर) आणि 25 कर्मचारी तैनात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासूनच कचरा संकलनाचे काम सुरू होते. रेल्वे स्थानकाजवळील घाऊक भाजी बाजारातील कचरा उचलण्याला प्राधान्य दिले जात आहे. घंटागाडी प्रत्येक चाळ आणि गृहसंकुलात 5 ते 10 मिनिटे थांबते, तरीही काही नागरिक गाडी गेल्यावर रस्त्यावर कचरा फेकतात, अशांवर आता मुकादमांमार्फत नजर ठेवली जात आहे.
उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण मोठे असते. अन्नाच्या शोधात असलेल्या गाई, बैल आणि कुत्रे या पिशव्यांसह कचरा खातात. यामुळे अनेक जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या स्वच्छ जिल्हा संकल्पनेला साजेसे काम करण्यासाठी आता प्लास्टिकमुक्ती आणि कचरामुक्ती या दोन्ही आघाड्यांवर नगरपरिषद काम करत आहे. एखाद्या भागात घंटागाडी वेळेवर येत नसेल किंवा कर्मचारी कचरा उचलण्यास टाळाटाळ करत असतील, तर नागरिकांनी थेट नगरपरिषदेकडे किंवा संबंधित भागाच्या मुकादमाकडे तक्रार करावी. कचरा घंटागाडीतच द्यावा आणि बांधकाम साहित्य उघड्यावर टाकू नये, असे आवाहन परिषदेमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.