दीपक गायकवाड : खोडाळा
अवकाळी पाऊस थांबला, दिवाळीही सरली. त्यामुळे अवकाळी पावसातून उरले सुरले काढण्याची घाई बळीराजा करत आहे. त्यामुळे भात कापणीसाठी हलक्या आणि धारदार विळ्यांना शेतकरी पसंती देत असून, कारागिरांकडून विळ्यांना धार लावण्यास व नवीन विळे बनविण्याची बळीराजाची लगबग सुरू आहे. शेती काम करण्यासाठी हातात बसेल असा हलका विळा असेल, तर कामही लवकर होते आणि वेळही वाचत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागात अजूनही शेतकरी पारंपरिक विळ्यांच्या साह्याने भातकापणी करतात. त्यामुळे अवजारांची जुळवाजुळव करून बळीराजा मिळेल त्या मनुष्यबळाच्या आधारे शेतातील धान गोळा करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी विळे-कोयते कारागिरांकडून धार लावन घेणे व विळ्यांना मुठी बसविण्याचे काम सुरू आहे. काही सधन शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करत आहेत. यामध्ये श्रम, वेळ व पैसा बचत होत आहे. मात्र ग्रामीण, आदिवासी भागातील शेतकरी महागड्या यंत्राकडे न झुकता पारंपरिक विळ्यांनी भात कापणीस प्राधान्य देत आहे.
दिवाळीनंतर विळे-कोयते कारागीर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या शेतीसाठी उपयोगी विळे कोयते यांसारख्या शेती अवजारांना धार लावून देण्याची कामे दरवर्षी करतात. यात नवीन, जुने विळेही दुरुस्त करून त्याला धार लावून दिली जाते. तसेच, मूठ बसवून दिली जाते.
शेतातच भात झोडणी...
अवकाळी पावसामुळे शेतकरी कावला आहे. त्यामुळे भात कापणी करून लगेच ताडपत्री टाकून शेतातच झोडणी करत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले भातपीक उन्हामध्ये माळरानी सुकवून पावसाच्या भीतीने झोडणीला वेग आला आहे. बळीराजाने मिळेल त्या मजुरांचा आधार घेऊन उरले सुरले धान्य गोळा करण्यासाठी घाई गडबड करत आहे.
पांचाळानाही अवकाळीचा फटका...
दरवर्षी पांचाळ भात पिकांचे उत्पादन होत असलेल्या भागात जाऊन विळे कोयते बनवून देतात. यावर्षी दिवाळीनंतर आलेल्या पांचाळाना अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे कुटुंब कबिल्यासह आलेल्या पांचाळाना मिळेल तिथला आधार घ्यावा लागला. परिणामी, लोखंड तापविण्यासाठी लागणारा कोळसा भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे पांचाळाने सांगितले.
भातकापणी भरभर होण्यासाठी हलका आणि धारदार विळ्याची गरज असते. त्यासाठी जुन्या बोथट झालेल्या विळ्याला धार लावून काम फत्ते होते. वर्षातून एकदा येणाऱ्या पांचाळाकडूनच हे काम उत्तम होते. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांबरोबरच धारदार अवजारांनाही तितकेच महत्त्व आहे.भिका वारे, शेतकरी, दुधगाव
बाहेरून आलेल्या विळे कोयत्या वाल्यांनी आमच्या पोटावर पाय दिलेला आहे. बारा महिन्यातून आम्हालाही हा एकदा एकच हंगाम मिळत असल्याने आमचीही मदर त्याच्यावरच अवलंबून आहे मात्र हे राजस्थानहून आलेले विळे कोयतावाले आपले अवजारे खपवण्याच्या नादात दुय्यम प्रतीचे साहित्य गळ्यात मारून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.किसन गोविंद काळे, लोहार काम कारागीर