Palghar Rice Farming Pudhari
पालघर

Palghar Rice Farming: पालघर जिल्ह्यात हळव्या भाताची कापणी सुरू; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

पावसाअभावी गरव्या पिकांच्या उत्पादनावर संकट

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: पालघर जिल्ह्यात हळव्या भातपिकाच्या कापणीला वेग आला असून अनेक ठिकाणी झोडण्यांची कामेही सुरू झाली आहेत.

हळव्या भाताचे पीक समाधानकारक असले, तरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने निमगरव्या आणि गरव्या भातपिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. उभ्या पिकाला पाण्याची गरज असताना शेतातील ओलावा संपुष्टात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये भातकापणीची लगबग सुरू आहे. शेतकरी आणि मजूर भात कापणी, भारे बांधणी तसेच धान्य वाळविण्याच्या कामात व्यस्त आहेत. यंदा भातपीक डौलदार उभे राहिल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती.

मात्र, पावसाअभावी गरव्या पिकांची अवस्था खालावत असल्याने अपेक्षित उतारा मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आणखी एकदा पावसाची सर आली असती, तर पिकांना दिलासा मिळाला असता, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

पालघर जिल्ह्यात भातशेती हे प्रमुख पीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. भातकापणीनंतर काही शेतकरी भाजीपाला, कडधान्ये आणि फुलांची लागवड करतात.

मात्र, यंदा वेळेपूर्वीच शेतातील ओलावा कमी झाल्याने आगामी रब्बी हंगाम कसा घ्यायचा, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच शेतीकामांसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून वाढलेल्या मजुरीमुळे उत्पादन खर्चात भर पडत आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कापणीची कामे पूर्ण करत आहेत.

पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची धडपडही सुरू आहे. पावसाअभावी गरव्या भातपिकांचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT