Palghar Landslide Risk pudhari photo
पालघर

Palghar Landslide Risk : पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणे भूस्खलन, दरडीच्या छायेत

काही दिवसांपूर्वीच जव्हारमध्ये मोठे भूस्खलन, लोकवस्ती नसल्याने अनर्थ तळला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यातील झांजरोळी या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते याच बरोबर महालक्ष्मी गडाच्या रस्त्यावर तांदूळवाडी जवळ देखील भूस्खलन झाल्याची घटना ताजीच आहे. याचबरोबर आता जव्हार तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

यंदाच्या हंगामात झालेला मुसळधार पाऊस तसेच जव्हार भागात बसणारे भूकंपाचे धक्के यामुळे भूस्खलनाचे प्रकार घडले असून आपटाळे धरणा जवळ काही दिवसापूर्वीच मोठ्या प्रमाणात डोंगर ढासळण्याचा प्रकार घडला. यामुळे २०० लांबीचा रस्ता वाहून गेला असून या प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

जव्हार जवळ राज्यमार्ग क्रमांक ७७ ते खडखड, कुंडाचा पाडा, आपटाळा, अळीव माळ, आखर साकुर ते प्रमुख जिल्हा मार्ग १०७ ला जोडणाऱ्या रस्त्यावर आपटाळा जवळ २५ जुलै च्या रात्री मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या प्रकारामध्ये डोंगरावरील २० मीटर पेक्षा अधिक उंचीची माती, दगड ढासळून खाली उतरला असून २०० मीटर रुंदीचा रस्ता वाहून जाऊन त्या ठिकाणी आठ ते दहा मीटर खोली निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यासह धरणाकडे व इतर पाड्यांकडे जाणाऱ्या इतर दोन अंतर्गत रस्ते देखील बाधित झाले आहेत.

या डोंगराच्या पायथ्याशी कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नसल्याने माळीण सारख्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली नाही. मात्र आपटाळे येथून नाशिक करिता जाण्यासाठी झाप - जव्हार या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अभियंतांशी संपर्क साधला असता डोंगरावरील मातीच्या इतर भागाला देखील भेगा पडल्याचे दिसून आले आहे.

भूस्खलनामुळे रस्त्यालगत साचलेल्या मातीच्या ढिगार्‍याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तर अधिक प्रमाणात भूस्खलन होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घडलेल्या प्रकाराची पाहणी मुंबई आयआयटीच्या तज्ञांकडून करण्यात आली असून या प्रकरणात अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना आखण्यात येतील असे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जामसर भागात भूस्खलन

सेलवास जामसर वावर या राज्यमार्ग ७२ वर देखील यंदा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहून गेल्याने रस्त्याच्या आधार भिंती (रिटेनिंग वॉल) खराब झाले आहेत. वावर गावापासून सुमारे १०० मीटर पुढे जमीन ढासल्याचा प्रकार घडला असून मुख्य रस्त्यावर साडेतीन फूट खोल अशी भेग रस्त्याच्या मधोमध पडली आहे. यामुळे रस्त्याच्या एका मार्गिकेवरील वाहतूक सुरू असून दुरुस्तीसाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

यंदाच्या वर्षी अधिक भूस्खलन

गेल्या काही महिन्यांपासून जव्हार भागात भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के बसत आहेत. तसेच यावर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिणामी यंदाच्या वर्षी भूस्खलनाचे अधिक प्रकार घडल्याची माहिती तज्ञांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांचे नुकसान झाले असून राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT