Palghar District Pudahri
पालघर

Palghar District: जिल्हा मुख्यालय गाठताना अर्ध्या जिल्ह्याची दमछाक; 20 किमी रस्त्यासाठी तासांचा कालावधी

मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि तलासरीतील नागरिकांना मनोरमार्गे पालघर गाठावे लागते; रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न कायम

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला याला आज 12 वर्षे पूर्ण झाली. आजही पालघर जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी तब्बल अर्ध्या जिल्ह्याची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. कारण की जिल्हा मुख्यालय पालघर झाले.

मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच्या रस्त्यांचे साधे रुंदीकरण अद्याप पर्यंत करता आले नसल्याने खंत व्यक्त होत आहे. आज मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा तलासरी या तालुक्यातून पालघरला पोहोचण्यासाठी मनोर मार्गे पालघरला यावे लागते.

मात्र आज मनोर ते पालघर 20 कि.मी चा रस्ता हा घाट रस्ता असल्याने अनेकदा भारी वजनाची वाहने कमी वेगाने चालतात.

यामुळे छोट्या वाहनांना देखील अडकून पडावे लागते त्यातच या रस्त्यावर वर्दळ जास्त असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे देखील कठीण होऊन बसते एवढेच काय ओव्हरटेक करणे जिकरीचे देखील बनते यातून मोठे अपघात देखील होतात तर पावसाळ्यात तर अनेकदा दरडी कोसळून हा रस्ता काही तासांसाठी बंद पडल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत.

यामुळे तब्बल 90 किमी वरून पालघर मुख्यालयाला जाणारे कर्मचारी असतील की सर्वसामान्य नागरिक यांची पुरती दमछाक होऊन 20 किमी रस्त्यासाठी तब्बल तासाहून अधिक वेळ वाया जात असल्याने स्वतंत्र जिल्हा होऊन देखील मुख्यालय गाठताना आजही जवळपास निम्मा जिल्हा हैराण होत असल्याचे एकूणच चित्र आहे.

एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचे मोजमाप करताना जिल्हाभरातील रस्त्यांचे योगदान यामध्ये महत्त्वाचे ठरते आज जिल्ह्याला जोडणारे अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असून याहीपेक्षा भयंकर म्हणजे सर्व रस्ते एकेरी असल्याने आणि दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने अनेकदा जिल्हा गाठताना मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात आहे.

बोईसर डहाणू भागातून जरी पालघर यांचे म्हटले तरी खूप छोटे रस्ते आहेत तर मोखाडा जव्हार विक्रमगड यांना पोहोचण्यासाठी देखील रस्त्यांचे चौपदरीकरण होणे आवश्यक आहे.

अशाही परिस्थितीत मनोर पर्यंत पोहोचणे आज जरी सोपे वाटत असले तरी भविष्यात याही रस्त्यावर रहदारी वाढून ट्रॅफिक जाम सारखे प्रकार घडतील असा अंदाज व्यक्त होत आहे मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे वसई तालुका असेल ही जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी या सगळ्यांना मनोर वरून पालघर गाठताना तारेवरची कसरत करावी लागत आहे कारण की हे अंतर अवघे वीस किमी असले तरी हा संपूर्ण रस्ता घाट रस्ता आहे.

तीव्र वळणे तीव्र चढ आणि तेवढेच तीव्र उतार देखील आहेत अशा वेळी जर जड मालवाहतूक करणारे वाहन स्लो झाले किंवा रस्त्यात नादुरुस्त झाले तर मात्र या घाटात अनेकदा लांबच्या लांब रांगा लागतात. त्यातून वाहन चालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात ही समस्या तर अधिक तापदायक बनते. यामुळे पालघरला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांचे चौपदरीकरण होणे अतिशय आवश्यक बनले आहे.

यासाठीच्या अनेक घोषणा आणि वल्गना आजपर्यंत झालेले आहेत पालघर नाशिक महामार्गाचे देखील लवकरच चौपदरीकरण होणार असल्याचे चित्र आहे तशी मोजणी देखील सुरू असल्याचे दिसून येते मात्र आज जिल्हा होऊन बारा वर्षांचा कालावधी झाल्याने याबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे बनले आहे.

मुळात पालघर जिल्हा मुख्यालय ठरवताना या भागातील आदिवासींसाठी विकासाच्या योजना त्यांच्या दारात आणण्याच्या कल्पना मांडण्यात आल्या. मात्र आज त्याच आदिवासी बांधवांना जिल्हा मुख्यालय काढताना मात्र अक्षरशः मेटाकुटीला यावे लागत आहे.

शासनाकडून ठोस उपाययोजनांची प्रतिक्षा

स्वतःची वाहन असल्यास यांची ही परिस्थिती आहे. तर ज्या बांधवांना आपल्या कामासाठी जिल्हा मुख्यालय जायचे आहे अशांना बस सेवेचा उपयोग करावा लागतो. मात्र मोखाडासारख्या दुर्गम तालुक्यातून जिल्हा गाठताना अक्षरशः पहाटे निघून रात्री उशिरापर्यंत पोहोचावे लागत असल्याने विकासाची गंगा दारात येईल तेव्हा येईल मात्र मुख्यालय पाहण्यासाठी देखील अख्खा दिवस येथील सर्वसामान्यांना खर्च करावा लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

यामुळे आज अनेक मोठमोठे प्रकल्प पालघर जिल्ह्याला धडका देत असताना रस्त्यासाठी शासनाकडून उपाययोजना कधी होतील हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT