पालघर: भिवंडी शहरातील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींच्याविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. १०९ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या मालकीच्या अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळीच्या भागातील इमारतीचे पाडकाम महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
पालघर शहरात जुन्या व जीर्ण इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याचा धोका वाढत असल्याने नगरपरिषदेने सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरातील तब्बल १०९ धोकादायक इमारतींना नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.
यामध्ये ५४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत, ४४ इमारती धोकादायक श्रेणीत, तर ११ इमारती रिकाम्या न करता दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अतिधोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अतीधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार बळाचा वापर करून इमारत रिकामी करण्याची आणि निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. विशेषतः रेल्वे स्थानक परिसरासारख्या गर्दीच्या भागातील नगर परिषदेच्या मालकीच्या अती धोकादायक इमारतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक इमारतींचे पाडकाम आणि आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर आहे.
पालघर शहरातील धोकादायक इमारतींच्या बाबतीत नगर परिषद गंभीर असून नगर परिषदेच्या मालकीच्या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात खासगी मालकीच्या अती धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे नियोजन केले जात आहे.- उत्तम घरत, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद.