चार विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीवर चढवून साफसफाई व टाकी भरण्याचे काम करून घेतल्याचा प्रकार Pudhari
पालघर

Dahanu News | आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! मुलांना चढवले पाण्याच्या टाकीवर

उर्से (म्हसाड) येथे विद्यार्थ्यांकडून टाकी स्वच्छता व भरण्याचे काम; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Dahanu Tribal Ashram School

कासा : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील उर्से (म्हसाड) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत समोर आला आहे. शाळेतील तीन ते चार विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीवर चढवून साफसफाई व टाकी भरण्याचे काम करून घेतल्याचा प्रकार गुरूवारी (दि. १९) उघडकीस आला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील सुखट आंबा येथे पाण्याच्या टाकीशी संबंधित दुर्घटनेत दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उर्से येथे विद्यार्थ्यांकडून असे धोकादायक काम करून घेतल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. टाकीची स्वच्छता व देखभाल प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा उपायांसह करून घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना टाकीवर का चढवण्यात आले, त्यांना काम करण्यास कोणी सांगितले आणि त्यावेळी जबाबदार कर्मचारी कुठे होते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुर्गम भागातील पालक १५ ते २० किलोमीटर अंतरावरून मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात. निवास, भोजन आणि शिक्षणासोबत सुरक्षिततेची हमी मिळेल, या विश्वासाने ते मुलांना शाळेत ठेवतात. मात्र, विद्यार्थ्यांकडूनच धोकादायक कामे करून घेतली जात असतील, तर पालकांनी विश्वास कोणावर ठेवायचा, असा सवाल केला जात आहे.

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून शाळेच्या कामकाजावर पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. मुख्याध्यापक व अधीक्षकांनी या प्रकरणाबाबत माहिती देण्याचे टाळले.

दरम्यान, प्रकल्प कार्यालयाने घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले आहे. संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षकांवर चौकशीनंतर योग्य कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंग्रजी विषयाचे अध्यापन नियमित नसल्याची तक्रार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेबाबतही तक्रारी आहेत. माध्यमिक वर्गांना इंग्रजी विषयाचे नियमित अध्यापन होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मुख्याध्यापकांकडे इंग्रजी विषय असूनही पुरेसे अध्यापन होत नसल्याने शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक गुणवत्तेचीही सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे.

प्रकल्प कार्यालय डहाणू येथील चौकशी कमिटीने शाळेला भेट दिली असून त्याबबाबत चा अहवाल अप्पर आयुक्त ठाणे यांना पाठवण्यात येईल, त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पुढील दोषी शिक्षक आढळल्यास कारवाई करण्यात येईल
- सिद्धार्थ राजकुमार, प्रभारी प्रकल्प अधिकारी, डहाणू
विद्यार्थ्यांना टाकीवर कोणी चढण्यास सांगितले, त्यातील एखाद्या विद्यार्थ्यांच्या जीवास बरे वाईट झाले असते तर दोषी कोणाला ठरवायचे. याबाबत शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी
- सतेंद्र मातेरा, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT