Dahanu Vivlavedhe Sarpanch Attack
कासा : डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत विवळवेढे सरपंच नितेश भोईर हल्ला प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अद्याप २ आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे. सरपंच नितेश भोईर यांच्यावर अंतर्गत वादातून हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अजून आरोपींचा शोध सुरू आहे.
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू असताना विवळवेढे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच भोईर यांचा दि. २३ एप्रिलरोजी पहाटेच्या वेळी जत्रेतून घरी जात असताना दुचाकीवरून पडून भीषण अपघात झाला होता. अपघाताची पाहणी केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. अपघातात त्यांचा एक हात फॅक्चर झाला असून डोक्याच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतर सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अधिक तपासानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले असून अंतर्गत वादातून हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अजून काही आरोपींचा शोध सुरू आहे. कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहे.
सरपंच नितेश भोईर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप तपास सुरू आहे. काही आरोपींचा शोध सुरु आहे. उर्वरित आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल.- अविनाश मांदळे, प्रभारी पोलीस निरीक्षक, कासा पोलीस ठाणे