Dahanu Kasa Road Potholes Issues
कासा : डहाणू तालुक्यातील डहाणू–जव्हार–नाशिक या प्रमुख राज्य मार्गावरील चारोटी ते कासा दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि आदिवासी बांधवांकडून होत आहे.
डहाणू ते चारोटी या राज्य मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असले तरी चारोटी ते कासा हा टप्पा अद्याप खड्ड्यांच्या विळख्यात आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, पहिल्याच जोरदार पावसात ही मलमपट्टी वाहून गेल्याने रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.
खड्डेमय रस्त्यामुळे दोन दिवसांपूर्वी अपघाताच्या घटनाही घडल्या असून, भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कासा ही पूर्व डहाणूतील आदिवासी भागाची प्रमुख बाजारपेठ असल्याने दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे निकृष्ट दर्जाने बुजविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याने कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र झाली आहे. विभागाच्या कार्यपद्धतीवरही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कासा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, चारोटी ते कासा दरम्यान सुमारे दहा हजारांहून अधिक आदिवासी बांधवांची रॅली काढण्यात येणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिक व आदिवासी बांधवांनी केली आहे.