पालघर : चुनाभट्टी परिसरातील पाणथळ असलेल्या ठिकाणी बगळे, अन्य जातीचे काही पक्षी मृतावस्थेत त्याचप्रमाणे काही अर्धमृत अवस्थेत आढळून आले आहे. मृत अवस्थेत आढळून पक्षी आढळून आल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पालघर तालुक्यातील शिरगाव येथील पर्यावरण प्रेमी अहमद नजीब खलिफा हे नेहमीप्रमाणे चुनाभट्टी परिसरात असलेल्या पाणथळ भागात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास या भागात फेरफटका मारत असताना त्यांना 6 ते 7 बगळे आणि इतर प्रजातीचे पक्षी मृतावस्थेत आढळले. त्याचप्रमाणे 3 ते 4 पक्षी अर्धमृत अवस्थेत निपचित पडल्याचे दिसले. खलिफा यांनी मृत पक्षांना एका ठिकाणी जमवले आणि अर्धमृत अवस्थेतील पक्षांचा भटक्या जनावरापासून बचाव व्हावा यासाठी सुरक्षित ठिकाणी एका झोपडीत आणून ठेवले. पक्षी मृत तसेच अर्धमृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले.
चुनाभट्टी परिसरातील पाणथळ परिसरात काही लोक पाण्यात कॅप्सूल मधून आणलेले रासायनिक द्रव्य पाण्यात मिसळून पक्षांच्या शिकारीचा प्रयत्न करीत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बहुतांश पाणथळ जागांवर अवैध्य रित्या घरघुती तसेच परिसरातील रासायनिक घनकचरा टाकला जातो, विषारी रसायने पाण्यात मिसळल्याने पाण्यातील माशांचा मृत्यू होतो. हे मासे बगळ्यांनी खाल्ले असावेत किंवा घरातील कचऱ्यात थायमेट, डीडीटी सारखे रासायनिक पदार्थ असावेत ज्यामुळे असे घडू शकते असा संशय जैवविविधतेचे अभ्यासक प्रा.भूषण भोईर यांनी व्यक्त केला आहे.