Palghar Jal Jeevan Mission Pudhari
पालघर

Palghar Jal Jeevan Mission: चिंचारेत जलजीवन मिशनचा बोजवारा; अपूर्ण कामे, निधी अदा झाल्याचा दावा

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल

पुढारी वृत्तसेवा

पालघर: ‘जल हेच जीवन’ असा संदेश देत शासनाकडून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे.

मात्र पालघर तालुक्यातील चिंचारे परिसरात या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे अपूर्ण असल्याचा आरोप होत असून, विहीर आणि पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच सुमारे ६० टक्के निधी अदा झाल्याची माहिती समोर येत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिंचारे परिसरातील जलजीवन मिशनच्या कामांमध्ये कथित हलगर्जीपणा आणि कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विहिरीचे काम आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसताना निधी अदा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासणी, मोजमाप आणि देयक मंजुरीची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. चिंचारे गावाजवळील सूर्या नदीवरील बांधाऱ्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

कामांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

जलजीवन मिशनअंतर्गत विहीर आणि पाण्याच्या टाकीची कामे अद्याप अपूर्ण का आहेत? सुमारे ६० टक्के निधी अदा झाल्याचा दावा खरा असल्यास त्याचा अधिकृत तपशील काय? कामांची गुणवत्ता तपासणी आणि मोजमाप कोणी केले? बांधाऱ्याच्या गेटमधील पाणीगळती रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? संबंधित ठेकेदारांच्या कामाची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली जाणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

एमआयडीसीसाठी पाणी, स्थानिक प्रतीक्षेत?

सूर्या नदीतील पाणी एमआयडीसी साठी नेण्याचे नियोजन असल्याची चर्चा असताना परिसरातील स्थानिक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

पाण्याचा स्रोत परिसरात उपलब्ध असूनही स्थानिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसेल, तर अशा योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यापूर्वी स्थानिक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन त्यांच्या पाणीहक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने चिंचारे परिसरातील कामांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. जलजीवन मिशनच्या कामांचे आर्थिक व तांत्रिक लेखापरीक्षण करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, तसेच बांधाऱ्याच्या गेटमधील पाणीगळती बंद करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी
-हरेश वावरे, राज्य सहसचिव, श्वेत स्वराज्य क्रांती पक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT