पालघरमध्ये चिमुकल्यांच्या हातून पक्ष्यांसाठी ‌‘घरकुल‌’  pudhari photo
पालघर

Palghar Bird House Activity : पालघरमध्ये चिमुकल्यांच्या हातून पक्ष्यांसाठी ‌‘घरकुल‌’

दारशेतच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पक्षीसंवर्धनाबाबत प्रेरणादायी उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः पर्यावरण संवर्धनासोबतच पक्षी संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा उपक्रम पालघर तालुक्यातील दुर्गम दारशेत चौकी पाडा येथे पाहायला मिळाला. येथील वीणा वसंत वैद्य वाचनालयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि संवेदनशीलतेतून पक्ष्यांसाठी सुंदर घरटी तयार करून निसर्गप्रेमाचा आदर्श घालून दिला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पक्ष्यांना निवारा, अन्न आणि पाण्याची मोठी गरज भासत असते. ही बाब लक्षात घेऊन वाचनालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पक्ष्यांसाठी आकर्षक घरटी तयार केली. तयार केलेली ही घरटी वाचनालय परिसरातील झाडांवर काळजीपूर्वक बांधण्यात आली. तसेच घरट्यांमध्ये पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याने परिसरातील पक्ष्यांना दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केवळ सर्जनशीलता दाखवली नाही, तर पर्यावरण आणि जीवसृष्टीबद्दलची आपली जाणीवही कृतीतून व्यक्त केली. वाचनालयाचे दिनेश गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पूर्ण केला.

एकीकडे वाढत्या नागरिकरणामुळे पशु, पक्षांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर होत असताना दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, पक्षी संवर्धनासोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या चिमुकल्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT