Palghar Chhatrapati Sambhajinagar Bus Accident
मोखाडा : पालघर व्हाया वाडा खोडाळा मार्गे छ. संभाजी महाराजनगर बस (एमएच ०६, ९५७०) श्रीघाट ते देवगांव दरम्यान देवगांव फाट्यानजीक वळणार अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यातील शाहनुरुबी खान (वय 60) यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना अपघात स्थळावरुनच अधिक उपचारासाठी हलविले आहे.
पालघर आगाराची पालघरमधून 7 वाजता सुटणारी पालघर - वाडा - छ. संभाजीनगर बस (एम.एच 06, 9570)ही खोडाळा मार्गे नाशिककडे मार्गक्रमण करत असताना श्रीघाट ते देवगावच्या दरम्यान देवगाव फाट्याच्या अलीकडील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला साईडपट्टी सोडून जाऊन कलंडली. यामध्ये शिवराम झुगरे यांच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना खोडाळा येथे हलविण्यात आले.
तर चंद्रकांत शिद यांना बरगडीला मार लागून जखमी झाले असून नसीमा शेख (वय 26, बुलढाणा) सूरज देहाडे (वय 42, आव्हाटे) सोनाली देहाडे (वय 30, आव्हाटे) अपेक्षा देहाडे (17,आव्हाटे) कल्याणी देहाडे (14,आव्हाटे) दिव्याक्षी देहाडे (12, आव्हाटे) सिद्धार्थ देहाडे (09, आव्हाटे) सीता खाडगीर (33, खोडाळा) जानकी मानकरी (60, आडोशी) बेबी पारधी (60, पळसपाडा) बुधी पारधी (65,पळसपाडा) रुपाली बरफ (13, रायपाडा) जखमी झाले. तर पालघरहुन नाशिककडे प्रवास करणाऱ्या शाहनूरुबी यांचा हात मोडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली आहे.
बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करत होते. रस्ता खराब असल्यामुळे चढत्या वळणावर चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. यामध्ये प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून वाहक व चालक सुरक्षित आहेत. मात्र, अपघातानंतर चालक भ्रमणध्वनीवरून बोलत असल्याचे अपघात ग्रस्तांमधून ऐकायला मिळाले आहे.
वेगावर नियंत्रण हवे
पालघर आगाराच्या बस नाशिककडे मार्गक्रमण करत असताना सुसाट वेगाने धावत असतात. सुर्यमाळ, खोडाळा, श्रीघाट आणि देवगांव परिसर डोंगराळ असून नागमोडी वाळणाचा आहे. परिणामी, चालकांनी धोकादायक वळणाचा अंदाज घेऊन वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.