कासा : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले आहे. वाणगाव परिसरातील वनई, साखरे, हनुमाननगर, शिगाव, चंद्रनगर आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी एकत्र येत कामस्थळी आंदोलन केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या जमिनीचा तसेच झाडे व घरे बाधित झाल्याचा मोबदला मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना केवळ नोटिसा देण्यात आल्या असून प्रत्यक्ष मोबदला न देता थेट काम सुरू करण्यात आल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमाननगर, शिगाव, चंद्रनगर परिसरातील सुमारे 27 शेतकऱ्यांच्या जमिनीवरून रेल्वे मार्ग जात असून, त्यांची शेती, झाडे व घरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. अंदाजे पाच ते सहा एकर जमीन ताब्यात घेण्यात आली असतानाही अद्याप प्रत्यक्ष मोबदला दिलेला नाही. मोबदला न देता जबरदस्तीने काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “आम्हाला समाधानकारक मोबदला मिळेपर्यंत आमची जमीन देणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी काम रोखले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम तात्पुरते बंद करण्यात आले.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी असा आरोप केला की, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मोबदल्याबाबत आश्वासन देऊन झाडे तोडली व घरे पाडली, मात्र प्रत्यक्ष पैसे दिले नाहीत. “सातबारा उतारा असूनही आम्हाला आमच्या जमिनीचे पैसे मिळाले नाहीत,” अशी व्यथा लक्ष्मण घवाळा, लक्ष्मण अंधेर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी भरत वायडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मोबदला न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास आणि तत्काळ मोबदला अदा न केल्यास बुलेट ट्रेन प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात येईल, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.