पालघर : रात्रीची वेळ... अचानक इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सने पेट घेतला... क्षणार्धात धुराचे लोट वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचले आणि रहिवाशांची एकच धावपळ उडाली. त्यातच पहिल्या मजल्यावरील सदनिकेत कुटुंबासह अवघे एक महिन्याचे बाळ अडकून पडल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली.
बाहेर आगीचा धूर, आत चिमुकले बाळ आणि त्याला बाहेर काढण्यासाठी काही क्षणांत निर्णय घेण्याचे आव्हान... अखेर ग्रामपंचायत उपसरपंच तनुजा घरत, सदस्य सूरज काठे आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत कारवर शिडी लावली आणि गॅलरीपर्यंत पोहोचून अवघ्या एक महिन्याच्या बाळाला धुराच्या कोंडीतून सुखरूप बाहेर काढले. माकणे येथील सेंट्रल पार्क परिसरातील प्रीती पर्ल इमारतीच्या 'ए' विगमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने परिसर हादरला.आगीची ठिणगी तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये पडली आणि काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली.
मीटर बॉक्समधून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडू लागल्याने इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, पहिल्या मजल्यावर एक महिन्याचे बाळ कुटुंबासह अडकून पडल्याची माहिती मिळताच सगळ्यांचे लक्ष त्या सदनिकेकडे गेले. धुराचे प्रमाण वाढत असल्याने वेळ हातातून निसटत होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह ग्रामपंचायत पदाधिकारी घटनास्थळी धावले. महावितरणचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी तातडीने इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र, बाळापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने मोठे आव्हान कायम होते.
बाळाच्या सुटकेसाठी धडपड
वेळ दवडणे धोकादायक असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायत उपसरपंच तनुजा घरत यांनी एका कारवर उभे राहून त्यावर शिडी लावण्याचा निर्णय घेतला. शिडीच्या मदतीने त्या गॅलरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागल्या. ग्रामपंचायत सदस्य सूरज काठे आणि स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. अखेर सर्वांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि गॅलरीतून त्या चिमुकल्या बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
बाळ सुखरूप बाहेर आल्याचे दिसताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही क्षणांपूर्वी धुराने भरलेल्या इमारतीत घबराटीचे वातावरण होते; मात्र स्थानिकांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. एका बाजूला धुराने वेढलेली इमारत आणि दुसऱ्या बाजूला जीव मुठीत धरून उभे असलेले कुटुंब.... अशा क्षणी स्थानिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला नवजीवन मिळाले.
३८ मीटर जळून खाक
दरम्यान, महावितरण कर्मचा-यांनी वीजपुरवठा बंद केल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मीटर बॉक्सला लागलेली आग नियंत्रणात आणली. या आगीत मीटर बॉक्समधील ३८ मीटर जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.