पालघरमध्ये बोगस पटसंख्येला बसणार चाप pudhari photo
पालघर

Palghar bogus student enrollment : पालघरमध्ये बोगस पटसंख्येला बसणार चाप

जिल्ह्यात होणार पटसंख्या पडताळणी; नवे नियम लागू

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पट पडताळणीसाठी राज्याच्या शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार एप्रिल महिन्यामध्ये पहिली ते नववी आणि अकरावी अशा वर्गांची पट पडताळणी होणार असल्याने सर्वच शाळांना मुलांची परीक्षा संपल्यानंतर मुलांना परत शाळेत आणण्याचे आव्हान उभे आहे. बोगस पटसंख्येला आळा बसावा म्हणून ही पट पडताळणी होत आहे.

जिल्ह्यातील शाळांमध्ये बोगस पटसंख्येवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 11 एप्रिलपासून ‌‘पटपडताळणी‌’ मोहिमेला सुरुवात होणार असून, यामुळे अनेक शाळांची ‌‘सरप्राईज‌’ तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व शाळांमधील प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आणि नोंदवहीतील पटसंख्या यांची पडताळणी केली जाणार आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवून दाखवली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत डिजिटल हजेरी प्रणाली आणि रिअल टाइम मॉनिटरिंगचा वापर केला जाणार असून, त्यामुळे तपासणी अधिक पारदर्शक होणार आहे. शिक्षकांनी दररोज ऑनलाइन हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात येणार असून, अचानक तपासणीद्वारे प्रत्यक्ष स्थितीची पडताळणी केली जाईल. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश या प्रक्रियेत होणार आहे. तपासणीदरम्यान नियमभंग आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

ही मोहीम सुमारे तीन दिवस चालणार असून, त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पटपडताळणीसाठी सर्व शिक्षकांना अलर्ट करण्यात आले आहे.

पट पडताळणीचे वेळापत्रक

पट पडताळणीचे वेळापत्रक जाहीर झाले असून ते खालीलप्रमाणे आहे. 11 एप्रिल - इयत्ता दुसरी ते नववी वअकरावी - मराठी विषय,15 एप्रिल - इयत्ता दुसरी ते नववी व अकरावी -गणित / भौतिक शास्त्र विषय ,22 एप्रिल इयत्ता दुसरी ते नववी व अकरावी - इंग्रजी विषय, अशा पद्धतीने पट पडताळणीचे वेळापत्रक जाहीरझाले आहे. यावेळी पहिल्यांदाच पहिलीपासून पट पडताळणी होणार आहे.

पट पडताळणी पारदर्शक

जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व गट शक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून शाळा निहाय अचूक नियोजन करून प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद स्टुडन्ट पोर्टलवर वेळेत करणे अनिवार्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT