पालघर शहर भाजपमधील मोठे नेते नाराज? Pudhari News Network
पालघर

Palghar municipal election : पालघर शहर भाजपमधील मोठे नेते नाराज?

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मध्यस्थी ; नाराजी दूरकरण्याचा होतोय प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत होत असताना आता पालघर शहर भाजपमध्ये बेबनाव असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी वाटपावरून महत्त्वाचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर या नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी काढण्यासाठी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी केली असून मनोर येथील एका हॉटेलमध्ये याबाबतीत तब्बल तासभर चर्चा झाल्याचे कळते आहे. या नाराजीचा पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फटका बसेल की चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर हे नाराज नेते सक्रिय होतील हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि या नाराज पदाधिकांमध्ये झालेल्या चर्चेत भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या कार्यपद्धतीवर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे, मात्र सध्या निवडणूक आहे पक्षाचे काम करा यावर नंतर तोडगा काढण्यात येईल असे चव्हाण यांनी आश्वासन दिल्याचे देखील समजते. यामुळे पालघर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे एकूणच चित्र दिसून येत आहे.

पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि काही जागांवर निवडले गेलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून भाजप नेते प्रशांत पाटील आणि समीर पाटील यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही यांच्या निर्णयाला महत्त्व न देता भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या गोटातील भाजप शहरातील पदाधिकाऱ्यांच्या जोरावर भाजपचा वारू चौफेर उधळल्याचे दिसून येत आहे.

अशा वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा देखील पालघरला झाली. यानंतर फडणवीस हेलिकॉपरने रवाना झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र थांबून या निवडणुकीची माहिती घेतली. यानंतर मनोर येथील मस्तान नाका या ठिकाणी असलेल्या एका खाजगी हॉटेलमध्ये भाजप मधील नाराज पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केल्याचे माहिती आता समोर येत आहे तब्बल तासभर राहन अधिक ही चर्चा चालल्याचे देखील समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांचे सूत जमत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मित्र पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्षातून सुद्धा रजपूत यांच्या एकाधिकार शाही कारभारावर अनेकदा टीका झाली आहे. तर रजपूत यांच्या विरोधात होणाऱ्या घटनेला पक्षांतर्गत त्यांची विरोधक सुद्धा खतपाणी घालत असल्याचे अनेकदा दिसून येते त्याचीच प्रचिती म्हणून चव्हाण यांच्यासोबत झालेल्या या नाराज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुद्धा हाच विषय चर्चेला आल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी डहाणू येथे घेतलेल्या प्रचार सभेत रजपूत यांची जोरदार पाठरखण करत त्यांचा प्रचार केला.

पालघरमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे

यामुळे पालघर मध्ये रजपूत यांचे भाजपमध्ये असलेले वजन अधोरेखित झाले. तर पालघर मधील हे नाराज पदाधिकारी चव्हाण यांच्या गोटातील असल्याचे देखील समोर येत आहे. यामुळे भविष्यात पालघर मध्ये देखील भाजपमध्येच दोन गट पडण्याचे चिन्ह आहेत. या बैठकीत खासदार हेमंत सवरा विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे हे देखील उपस्थित असल्याचे कळते आहे. यामुळे नाराज कार्यकर्ते सक्रिय होतील की याचा फटका भाजपला बसेल हे येणारी वेळच ठरवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT