पालघर ः शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य झाल्याने पालघर जिल्ह्यातील 9624 कार्यरत शिक्षक व डीएड, बीएड धारक उमेदवार 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. नोकरी टिकवण्यासाठी व अनुदानित/शासकीय शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातून यंदा 9,624 शिक्षक टीईटी परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर 1 (इयत्ता पहिली ते पाचवी) करिता 4,317 शिक्षक तर पेपर 2 (इयत्ता सहावी ते आठवी) करिता 5,307 शिक्षकांची नोंद करण्यात आली आहे. या परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण विभागाने कडक नियोजन केले आहे. पेपर 1 करिता जिल्ह्यात 11 परीक्षा केंद्रे व पेपर 2 करिता 16 परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारीचा आढावा घेतला आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा नियंत्रण विभागाची बैठक पार पडली. यामध्ये परीक्षेचे सुरळीत आयोजन, सुरक्षा व्यवस्था आणि गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी टंकपेट्या (स्टील ट्रंक्स) आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार सुरू आहे.
यासह परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून परीक्षेसंबंधीच्या सर्व सूचना शिक्षकांपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी शिक्षकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. प्रभारी उपशिक्षणाधिकारी ब्रिजेश गुप्ता यांनी या सर्व माहितीची पुष्टी केली आहे.गतवर्षी राज्यात टीईटीचा निकाल केवळ सुमारे तीन टक्के लागल्याने, या परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात घेऊन कार्यरत शिक्षक अत्यंत जोमाने अभ्यासाला लागले आहेत. 53 वर्षांपर्यंतच्या सर्व कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागण्याची भीती असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.टीईटी उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवारास शिक्षक म्हणून काम करता येते, ज्यामुळे उमेदवार शिक्षक म्हणून योग्य आहे की नाही, हे अजमावले जाते. त्यामुळे ही परीक्षा केवळ उत्तीर्ण होणे नव्हे, तर गुणवत्ता सिद्ध करणे यासाठी शिक्षकांमध्ये अभ्यासाचा ध्यास दिसून येत आहे.