पालघरमध्ये चुरशीचे 65 टक्के मतदान pudhari photo
पालघर

Palghar civic elections : पालघरमध्ये चुरशीचे 65 टक्के मतदान

वाडा, जव्हार, डहाणू, पालघर न.पा.च्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर, डहाणू, जव्हारनगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी तर वाडा नगर पंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला तर काही प्रभागातील मतांची आकडेवारी दुपारपर्यंत अतिशय कमी असल्याचे दिसून आले मात्र संध्याकाळी अनेक प्रभागातील मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे देखील दिसून आले.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकींचा निकाल हा आधी बुधवारी 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर विजयी उमेदवार निश्चित होणार आहेत.

जव्हार शहरातील प्रभाग 4 आणि प्रभाग 9 यामध्ये अतिशय प्रतिष्ठेची लढत असल्याने सर्वांचे लक्ष या प्रभागातच होते या ठिकाणी भाजप आणि ठाकरे गटात बाचाबाची झाल्याचे देखील दिसून आले तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडे सात वाजता धिम्या गतीने सुरुवात झाली होती. किरकोळ वाद वागळता मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप सुरु असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या, परंतु रोकड तसेच पैसे वाटप पकडण्यात प्रशासन अपयशी ठरले. एकूणच पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पैशांचा महापूर आला होता. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 44.22 झाली होती.

दर दोन तासांनी झालेल्या मतदानाचा कल पाहता मतदानाची सरासरी 55 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पालघर नगरपरिषद क्षेत्रातील एकूण 55 हजार 727 मतदारांपैकी 24 हजार 642 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जव्हारनगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच आणि दहा प्रभागातील 20 नगरसेवक पदासाठी तब्बल 69 उमेदवार आपले नशीब आजमावत होते काल झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्याचे दिसून आले.

जव्हार नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश करमरकर यांची ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती. तर प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी दुपारपर्यंत मतदारांमध्ये काहीशी निराशा दिसून आली तर दुपार नंतर मात्र या ठिकाणी सुद्धा मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.

काही ठिकाणी भाजप ठाकरे गट तर काही ठिकाणी भाजप शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणी केंद्रात जाणे,तर काही ठिकाणी पैसा वाटपाच्या चर्चेवरून सुद्धा बाचाबाची झाल्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वात जास्त मतदार असल्याने या ठिकाणी मतदान प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र होते. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये ईव्हीएम मशीन संथगतीने चालत असल्याने ते बदलण्यात आल्याने या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबवावी लागल्याचे दिसून आले.

डहाणू नगर परिषदेच्या 13 प्रभागांतील 27 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी 41 मतदान केंद्रांवर सोमवार 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत 8.72 टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी 1:30 वाजेपर्यंत ही टक्केवारी 35.84 पर्यंत वाढली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान 49.58 टक्क्यांवर पोहोचले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. डहाणू गाव, आगर आणि लोणीपाडा येथील मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

वाडा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी 17 मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. नगरपंचायत क्षेत्रात 12 हजार 893 मतदार असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 52.11 टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या अखेरीस जवळपास 62 टक्के मतदान झाले. नगरपंचायत हा थेट नागरिकांशी जोडलेला विषय असल्याने वाडा शहरातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. सकाळच्या सत्रात मंदावलेले मतदान दुपार नंतर मात्र झपाट्याने वाढले असून मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त असल्याने छावणीचे रूप आल्याचे बघायला मिळाले.

वाडा नगरपंचायतीच्या 17 प्रभाग सदस्यांसह 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक मंगळवारी पार पडली. वाडा शहरातील जिल्हा परिषद शाळा, दगडीशाळा, काथोडपाडा, उर्दू शाळा, तळ्याचा पाडा, गणेश मैदान अशा जवळपास 17 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात असून भाजपा व सेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस बघायला मिळेल असा अंदाज आहे. 17 प्रभागात नगरसेवक पदांसाठी 67 उमेदवार उभे असून यातही सेना व भाजपच्या उमेदवारांमध्येच काटे की टक्कर होणार असे बोलले जात आहे. वृद्ध, अपंग व तरुणांनी या निवडणुकीत विशेष उत्साह दाखविला आहे.

ईव्हीएम बंद पडले; 20 मिनिटांत दुरुस्ती

सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक 9/1 मध्ये ईव्हीएम दुपारी 4:50 वाजता बंद पडले. तथापि, मशीन 20 मिनिटांत दुरुस्त करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. संध्याकाळी 5:30 वाजे नंतरही डहाणू गाव, लोणीपाडा, आगर परिसरातील मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. एकूणच मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदारांची गर्दी पाहता रात्री उशिरा पर्यंत मतदान सुरू होते.

पैसे वाटपाच्या चर्चा खऱ्या की खोट्या

जव्हार नगरपरिषदेच्या अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपांच्या चर्चा चौकाचौकात रंगल्या होत्या. यामध्ये काही प्रभागात तर एका मोठ्या पक्षाकडून एका मतासाठी तब्बल 30 हजार रुपये वाटल्याची देखील चर्चा होती. तर बाकी प्रभागात काही पक्षांकडून 10 हजार 5 हजार असे मतदार निहाय पैसे वाटपाची चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेने असे कोठेही पैसे पकडल्याची घटना नाही. यामुळे यानंतर जव्हार मधील बाजारपेठा मात्र भरलेल्या दिसतील कारण लक्ष्मी दर्शन जोरात झाल्याची चर्चा मतदारांमध्ये दिसून येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT