Palghar gutkha seizure  
पालघर

Palghar gutkha seizure | सुरतहून भिवंडीकडे जाणारा ४० लाखांचा गुटखा पकडला, पान मसाला अन् आयशर टेम्पो जप्त

Palghar gutkha seizure-पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कासा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी पानमसाला (गुटखा) सुरत, गुजरात येथून भिवंडीच्या दिशेने आयशर टेम्पो घेवून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवरील महालक्ष्मी (विवळवेढे) येथे टेम्पो अडवला. यावेळी त्यामध्ये २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि सुमारे २० लाख ७७ हजार ६५२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला असा एकूण ४० लाख ७७ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आली.

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार नरेश चंद्रकांत घाटाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी महामार्गावर गस्त घालत होते. चारोटी टोलनाक्याजवळ असताना गुप्त बातमीदाराकडून सुरतहून एका आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी पानमसाला आणला जात असून तो भिवंडीत विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे गावातील महालक्ष्मी मंदिराजवळ वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी MH-03-ES-1791 क्रमांकाचा आयशर टेम्पो संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी हाताचा इशारा करून टेम्पो थांबविला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे यांच्यासह पथकाने पंचांच्या उपस्थितीत टेम्पोची तपासणी केली. टेम्पो चालकाचे नाव जाकिर हुसेन अजगरअली चौधरी (वय ५२, रा. अक्सा बिल्डिंग, भोलेनाथनगर, कौसा, मुंब्रा, ठाणे) असे असल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गोण्या आढळून आल्या. त्यामध्ये विमल पानमसाला व केसरयुक्त विमल पानमसाला असल्याचे आढळले.

पोलिसांनी पंचांसमक्ष मुद्देमाल कासा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून त्याची पाहणी केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २० लाख ७७ हजार ६५२ रुपये, तर टेम्पोची किंमत २० लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशाप्रकारे एकूण ४० लाख ७७ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

फिर्यादीनुसार, सदर प्रतिबंधित माल किम, सुरत येथून भरून भिवंडी येथे विक्रीसाठी नेण्यात येत होता. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेला हा पानमसाला वाहतूक, विक्री व साठवणुकीस मनाई असतानाही त्याची वाहतूक केल्याचा आरोप चालकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले असून चालकास अटक केली आहे.

ही कारवाई पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, पोलीस अंमलदार नरेश घाटाळ, राकेश पाटील, दिनेश गायकवाड, संजय धांगडा, बजरंग अमनवाड आणि विशाल कडव यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT