Palghar Fishermen Families Financial Aid AI Image
पालघर

Palghar Fishermen Families Financial Aid : पाकिस्तानच्या कैदेतील मच्छीमार कुटुंबांना राज्य शासनाचा आधार

पालघरमधील १९ मच्छीमारांच्या कुटुंबांना ८९ दिवसांचे अर्थसहाय्य

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : विरेंद्र खाटा

समुद्रातील सीमारेषा नजरचुकीने ओलांडून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात गेलेल्या पालघर जिल्ह्यातील १९ मच्छीमारांच्या कुटुंबांना राज्य शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानातील मलिर तुरुंगात बंदीवासात असलेल्या या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना ८९ दिवसांसाठी दररोज ३०० रुपये याप्रमाणे प्रत्येकी २६ हजार ७०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने एकूण पाच लाख सात हजार तीनशे रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, संबंधित मच्छीमारांच्या वारसांची बँक खाती तपासल्यानंतर ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक मच्छीमार गुजरातमधील मासेमारी बंदरांवरून समुद्रात जाणाऱ्या नौकांवर खलाशी म्हणून काम करतात. खोल समुद्रात मासेमारी करताना समुद्री सीमारेषेची माहिती नसल्याने किंवा नजरचुकीने नौका भारतीय सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करतात. अशा वेळी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांकडून नौकेसह त्यावरील मच्छीमारांना ताब्यात घेतले जाते.

मच्छीमार अनेक वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याने त्यांच्या कुटुंबातील कमावती व्यक्तीपासून कुटुंब दूर राहते. त्यामुळे कुटुंबीयांवर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन गुजरात सरकारकडून पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना बंदीवासातील प्रत्येक दिवसासाठी ३०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही राज्यातील बंदिवान मच्छीमारांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या आर्थिक मदतीमुळे मच्छीमारांच्या कुटुंबीयांना तात्पुरता आधार मिळणार असला तरी वर्षानुवर्षे मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसोबतच दोन्ही देशांच्या पातळीवर राजनैतिक हस्तक्षेप करून या मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील १८ मच्छीमार खलाशी तसेच पालघर तालुक्यातील एक मच्छीमार सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. यापूर्वी या १८ मच्छीमारांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. मात्र काही काळ हे सहाय्य बंद झाले होते. आता शासनाने पुन्हा ८९ दिवसांचे अर्थसहाय्य मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून हा निधी पालघरच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे वितरित करण्यात आला आहे. संबंधित मच्छीमारांच्या वारसांची बँक खाती तपासल्यानंतर शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदत थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील हे १९ मच्छीमार गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंदीवासात आहेत.

त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळत असली तरी मच्छीमारांच्या मायदेशी परतण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. समुद्रातील सीमारेषा चुकून ओलांडल्याप्रकरणी अटक झालेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीपेक्षा आपल्या कुटुंबीयांची सुखरूप सुटका होऊन त्यांचा मायदेशी परतावा अधिक महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारताच्या ताब्यातही ५३ पाकिस्तानी मच्छीमार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तसेच द्विपक्षीय कराराचा सन्मान राखत शिक्षा पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीने सुटका करून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवावे, अशी मागणी शांततावादी कार्यकर्ते आणि मच्छीमार संघटनांकडून करण्यात येत आहे. आर्थिक मदतीमुळे कुटुंबांना काही काळ दिलासा मिळणार असला तरी वर्षानुवर्षे परदेशातील तुरुंगात अडकलेल्या मच्छीमारांची मायदेशी सुखरूप परतफेड हाच या कुटुंबीयांसाठी खरा दिलासा ठरणार आहे.

१९ मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

पाकिस्तानच्या तुरुंगात बंदीवासात असलेल्या पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये नरेंद्र रवींद्र बुजड, अजय वसंत वाडू, संतोष रामू बुजड, किशोर उखड्या मस्या, संजय शिडवा ठाकरे, सचिन वसंत लहांग्या, सुभाष लाडक्या वरठा, राजू लक्ष्मण वरठा, प्रमेल रमण पाचलकर, रवींद्र गोपाल कलांगडा, विशाल नवश्या रावत्या, अक्षय प्रभाकर मल्या, विजन मोहन नगवासी, कृष्णा रमण बुजड, सरित सोन्या उंबरसाडा, नवश्या महाद्या भीमरा, उधऱ्या रामजी पाडवी, जयराम जान्या सालकर आणि नामदेव बाळकृष्ण मेहेर यांचा समावेश आहे. या १९ मच्छीमारांच्या कुटुंबीयांना ८९ दिवसांसाठी दररोज ३०० रुपये याप्रमाणे प्रत्येकी २६ हजार ७०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी एकूण पाच लाख सात हजार ३०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

करार असूनही सुटकेला विलंब का ?

भारत-पाकिस्तान कॉन्स्युलर ॲक्सेस करार २००८ मधील पाचव्या कलमानुसार, दोन्ही देशांच्या ताब्यात असलेल्या मच्छीमारांची राष्ट्रीयत्वाची ओळख निश्चित झाल्यानंतर त्यांना साधारण एका महिन्याच्या आत त्यांच्या मायदेशी परत पाठविणे अपेक्षित आहे. मात्र राष्ट्रीयत्व सिद्ध होऊनही पालघर जिल्ह्यातील मच्छीमार अनेक वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याने या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिक्षा पूर्ण होवूनही मच्छीमार अद्याप तुरुंगातच

शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या १९८ भारतीय मच्छीमार असून, त्यापैकी तब्बल १७८ जणांची शिक्षा अनेक वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, १० भारतीय मच्छीमारांची शिक्षा १६ जुलै २०२१ रोजी, ११५ जणांची १६ मार्च २०२२ रोजी, २१ जणांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी, १० जणांची ३१ जानेवारी २०२३ रोजी, तर २२ जणांची १८ जुलै २०२४ रोजी पूर्ण झाली आहे. शिक्षा पूर्ण होऊनही हे मच्छीमार अद्याप पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT