

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील बहुप्रतिक्षित सॅटिस, डी.पी. रोड तसेच इतर नियोजित महत्त्वाच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेली अंबरनाथच्या डिफेन्स इस्टेटची जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
यासंदर्भात नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा केला होता. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी या संदर्भात हिरवा कंदील दिला आहे.
नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी अलीकडेच दिल्ली येथे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंबरनाथमधील डिफेन्स इस्टेटची जमीन नगरपरिषदेला लवकरात लवकर हस्तांतरित करण्या संदर्भातील सविस्तर निवेदन दिले होते.
या निवेदनामध्ये प्रामुख्याने अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्प, कल्याण-बदलापूर रोड ते अंबरनाथ रेल्वे स्थानक जोडणारा प्रस्तावित डी.पी. रोड तसेच शहरातील इतर नियोजित सार्वजनिक पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी संरक्षण विभागाच्या जमिनीची असलेली तातडीची आवश्यकता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांची भेट घेऊन सदर विषय त्यांच्यासमोर मांडला. अंबरनाथ शहराच्या विकासाच्या दृष्टीने डिफेन्स इस्टेटची संबंधित जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याची विनंती त्यांनी संरक्षण राज्यमंत्र्यांकडे केली.
जमीन हस्तांतरण प्रक्रियेला मिळणार गती...
मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित संरक्षण विभागाला आवश्यक ती कार्यवाही करून योग्य आदेश पारित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.